आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा गावांचा पाणीप्रश्न सुटला ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भयाण दुष्काळावर मात करण्यासाठी चित्ते नदीच्या सात किलोमीटर पात्राचे लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यात आले. मान्सूनही चांगला बरसल्याने जलपुनर्भरण होऊन सहा गावांचा पाणीप्रश्न दूर झाला असून ४०० हेक्टर क्षेत्रही सिंचनाखाली आले आहे.
औरंगाबाद तालुक्यातील पाचोड, सिंदोण, भिंदोण, चित्ते पिंपळगाव, एकोड आदी गावे मोसंबी उत्पादनाचे आगार आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार ३५०० हेक्टरवर येथे मोसंबी पिकवली जात होती. पण दुष्काळात निम्म्या बागा जळाल्या. फळबागांचे उर्वरित क्षेत्र पशुधन विकतच्या पाण्यावर जगवले. यातून धडा घेत ग्रामस्थांनी चित्ते नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार बैठका घेऊन अभियान राबवण्यास सुरुवात केली. त्याला बजाज फाउंडेशन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह प्रशासनाची साथ मिळाली. एप्रिल ते जून यादरम्यान लोकसहभागातून किलोमीटर नदीपात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मान्सूनमध्ये वाहून जाणारे पाणी अडवलेच गेले नाही तर जलपुनर्भरण झाले. यामुळे नदीपात्रात ३५० टीसीएम संचय झाला आहे. ९०० विहिरींची पाणीपातळी शून्य फुटावरून ५० फुटापर्यंत वाढली आहे. नदीकाठच्या भूजल पातळीत तीन ते चार मीटरने वाढ झाली.

पूर्ण १७ किमीपर्यंत पुनरुज्जीवन करणार
लोकसहभागातून चित्ते नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे नदीपात्रात विपुल जलसंचय झाला आहे.
^ग्रामस्थांच्या धडपडीलाकृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास संस्था, बजाज फाउंडेशनची साथ मिळाल्याने अवघ्या तीन महिन्यांत चित्ते नदीचे किमी रुंदीकरण, खोलीकरण करण्यात यश आले. हा उपक्रम सुरूच राहणार असून यंदा पूर्ण १७ किमीपर्यंत नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. -अशोक कोंडे, तालुका कृषी अधिकारी, औरंगाबाद.

शेतकऱ्यांना दिलासा
ग्रामस्थांनी एकजुटीने राबवलेल्या या उपक्रमामुळे सिंदुण चिंचोली, एकोड, पाचोड, चित्तेगाव, चित्तेपिंपळगाव, शिवगड तांडा, भिंदोण या गावांचा पाणीप्रश्न सुटला. ४०० हेक्टरपेक्षा अधिक शेती सिंचनाखाली आल्यामुळे खरिपातील तूर, कपाशी तसेच रब्बीतील गहू, ज्वारी, मका आदी पिके घेणे शक्य झाले आहे, या भागातील मोसंबी उत्पादकांनाही या जलसाठ्याचा लाभ होणार असून या भागाला मोसंबीचे आगार ही ओळख पुन्हा प्राप्त होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी दिली.

एप्रिलमध्येच संकल्प
सरपंचनिर्मलाबाई घोडके, उपसरपंच पद्माबाई घोडके, बाबासाहेब घोडके, भरत पवार, सोपान मदगे, ज्योती पगारे, बापूराव भोसले, संजय चव्हाण, मोहन ताकपीर यांनी चित्ते नदीच्या पुनरुज्जीवन, वृक्षलागवड, पाण्याचा काटकसरीने वापर, कमीत कमी पाण्यात येणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करण्याचा एप्रिलमध्येच संकल्प केला होता. त्याचे पालनही केले जात आहे. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे कृषी अधिकारी कुलथे यांनी जलव्यवस्थापनाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.

बातम्या आणखी आहेत...