आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रियेचे पाणी डीएमआयसीला विकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भूमिगत गटार योजनेत उभारण्यात येत असलेल्या चार मलजल प्रक्रिया केंद्रातून २०१७ पर्यंत पाण्यावर प्रक्रिया करणे सुरू होणार असून त्यातून किमान १०० एमएलडी पाणी उपलब्ध होईल. हे पाणी डीएमआयसीला विकण्याची मनपाची तयारी आहे. या शिवाय पैठण रोडवरील कृषी संस्थेची गरजही या पाण्याने भागवली जाऊ शकते.
केंद्राच्या साहाय्याने सुरू झालेल्या भूमिगत गटार याेजनेतून शहरात सध्या कामे सुरू आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरात मुख्य पाइपलाइन चार मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे केंद्राने आपल्या वाट्याच्या निधीत १०९ कोटींची कपात केल्याने अंतर्गत पाइपलाइनचे काम कमी करण्याचा धाेका निर्माण झाला असून या निधीसाठी अन्य मार्गाने प्रयत्न करावे लागणार आहेत. असे असले तरी या योजनेतून मनपाला आगामी काळात सांडपाण्यातून उत्पन्न मिळण्याची संधी आली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी सांगितले की, न्यायालयात एक याचिका असून त्यावरील सुनावणी दरम्यान मनपाने एक शपथपत्र देत सर्वात आधी मलजल प्रक्रिया केंद्रे मुख्य पाइपलाइनचे काम केले जाईल, असा शब्द दिला. तो पाळणे बंधनकारक आहे. वाहून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते फेरवापरायोग्य बनवणे हा या प्रकल्पातील एक प्रमुख घटक आहे. या योजनेतून २१६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानुसार विविध क्षमतांची केंद्रे उभारली जात आहेत. सर्वात मोठे म्हणजे १६१ एमएलडी क्षमतेचे केंद्र कांचनवाडीत उभारले जात अाहे, तर बनेवाडी पडेगावात प्रत्येकी १० एमएलडी क्षमतेची तर झाल्ट्यात ३५ एमएलडीचे केंद्र उभारले जात आहे. या चारपैकी कांचनवाडी, बनेवाडी पडेगावची केंद्रे खामच्या खोऱ्यातील आहेत तर झाल्ट्याचे केंद्र सुखनेच्या खोऱ्यात आहे.

पाण्याचावापर करणार : यापाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पुन्हा वापरण्यायोग्य असेल. सांडपाण्यापैकी ८० टक्के पाणी पुन्हा वापरावे असा प्रयत्न राहणार असून त्यासाठीच हे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे. कार्यकारी अभियंता सिद्दिकी म्हणाले की, २०१७ पर्यंत या प्रकल्पांत किमान १०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. या पाण्यासाठी संभाव्य खरेदीदारही आहेत. शहरालगत होणाऱ्या डीएमआयसीची पिण्याशिवायच्या पाण्याची गरज या पाण्यातून भागू शकते. डीएमआयसी हे पाणी घ्यायला तत्त्वत: तयार आहे. पैठण रोडवरील कृषी संस्थाही आपली गरज या पाण्यातून भागवायला तयार आहे. याशिवाय बांधकामांसाठी हे पाणी देता येईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्यावरील १०० एमएलडीचा भार २०१७ मध्येच कमी होऊन अधिक पाणी पिण्यासाठी मिळू शकते.