आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता : पाणीपुरवठा पॉइंटवर थांबणार नाही, ग्रामसेवकांची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - तालुक्यातील १११ गावांत १४४ टँकर सुरू अाहेत. परंतु काही गावांत टँकर जातच नसल्याचा प्रकार "दिव्य मराठी'ने मंगळवारी समोर आणला होता. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने पाणी भरण्यात येणाऱ्या प्रत्येक पॉइंटवर टँकरमागे एक ग्रामसेवक ठेवण्याचे नियोजन करण्यासाठी पंचायत समितीमध्ये नायब तहसीलदार नामदेव देसटवाड यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची विशेष बैठक बुधवारी बोलावली होती. मात्र, ग्रामसेवकांनी इतर कामांचा ताण असल्याचे सांगून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पॉइंटवर थांबण्यास नकार दिल्याने बैठक पाच मिनिटांतच गुंडाळली. त्यामुळे काम न करणाऱ्या ग्रामसेवकांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे नायब तहसीलदार देसटवाड यांनी सांगितले. तालुक्यातील निम्म्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. एका-एका गावात चार ते पाच टँकरच्या दहा खेपा होत असल्याची नोंद करण्यात येते. मात्र, अनेक गावांत टँकर जातच नाहीत. गेले तरी किती खेपा झाल्या यावर प्रश्न निर्माण झाला असून पाचोड येथे फक्त कागदावरच टँकर सुरू असल्याचा प्रकार "दिव्य मराठी'ने उघडकीस आणला. याची दखल घेत प्रशासनाने तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रत्येक गावातील टँकरच्या माहितीसह अहवाल मागितल्याने टँकर लॉबीत एकच खळबळ उडाली. तहसीलदार देशमुख यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या विशेष पथकाची स्थापना करत प्रत्येक टँकरमागे एक ग्रामसेवक ठेवण्याचे आदेशित केले होते. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बुधवारी नायब तहसीलदार देसटवाड, गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी, पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे सुधाकर काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीमध्ये सर्व ग्रामसेवकांची बैठक बोलवण्यात आली. ग्रामसेवकांनी मुधलवाडी, फारोळा टँकर भरण्याच्या पॉइंटवर नेमणूकीसाठी मार्गदर्शन करणार होते.
त्या - त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवा
पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन कामांची अंमलबजावणी करा, अशा सूचना ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी यांनी केल्या. ही जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडे द्या, ते कामे करतील, असे ग्रामसेवकांचे म्हणणे असल्याचे गटविकास अधिकारी सोमवंशी यांनी सांगितले.
टँकरवाले चिंतित
तालुक्यातील काही वाळू तस्कर यांनी आपला वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा वापर टँकरसाठी सुरू केला आहे. शिवाय काही गावांतील सरपंच, पुढारीदेखील टँकरवाले झाले आहेत. टँकर लॉबी राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकत कागदोपत्री टँकर गावात पुरवत असल्याचे समोर येत आहे. "दिव्य मराठी'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सर्व टँकरची चौकशी होत असल्याने टँकर लॉबी दोन दिवसांपासून चिंतित असल्याचे दिसून येत आहेत.
अहवाल पाठवणार
> टँकर नियोजित गावात जात नसल्याचा प्रकार समोर आल्याचे उघडकीस आले आहे. या पुढे असे प्रकार पुन्हा होणार नाही, यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथकाबरोबरच ग्रामसेवक यांचे ही पथक या वेळी असणार आहे. मात्र, ग्रामसेवकांनी हे काम करण्यास नकार दिला असल्याने तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे.
- नामदेव देसटवाड, नायब तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...