आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारोळा केंद्रातील शॉर्टसर्किटमुळे निम्म्या शहराला निर्जळीचा धक्का, दोन पंप बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- फारोळ्यातून शहराकडे पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाच्या कनेक्शन बॉक्समध्ये बुधवारी सकाळी ११.१५ वाजता शॉर्टसर्किट झाल्याने एक रोहित्र निकामी होऊन शहराकडे पाणी पाठवणारे दोन पंप बंद पडले आहेत. उर्वरित तीन पंपांद्वारे शहरात पाणी आणण्यात येत असून गुरुवारी निम्म्या शहरात निर्जळी राहण्याची शक्यता आहे. ज्या भागात नियोजन करून पाणी देणे शक्य आहे, त्या भागातही कमी दाबाने पाणी मिळेल. 

फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध झाल्यावर ते शहराकडे पाच पंपांद्वारे पाठवले जाते. या केंद्रात दोन रोहित्रे आहेत. एका रोहित्रावर तीन, तर दुसऱ्या रोहित्रावर दोन पंप आहेत. दोन हजार केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावर दोन पंप चालतात. त्यापैकी एका पंपाच्या कनेक्शन बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याचा भार रोहित्रावर पडला. त्यामुळे रोहित्राचे दोन डीव निकामी झाले. मनपाच्या यांत्रिकी शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ डीव टाकून दुरुस्ती केली. मात्र, लोडमुळे थेट रोहित्रच नाकामी झाल्याचे तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत उघड झाले. या दुरुस्तीत दोन तास गेले. यापूर्वीच एक रोहित्र दुरुस्तीसाठी काढण्यात आले. त्याच्या दुरुस्तीला अजून दोन दिवस लागणार असल्याचे यांत्रिकी विभागाला कळाले. उद्या इतर ठिकाणाहून वीज घेऊन पाच पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज दिवसभरात शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. 
 
खंडपीठाचा मनपाला सवाल: सर्वसामान्यांना परवडेल काय टँकरचे पाणी? 
थकीतवीजदेयकांमुळे खंडित करण्यात आलेला शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात समीर राजूरकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी (२२ फेब्रुवारी) सुनावणी झाली. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी शहरात मुबलक पाणीपुरवठ्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी तोंडी विचारणा केली. टँकरचे पाणी सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना परवडण्यासारखे नाही. महानगरपालिका आणि महावितरण यांच्यामध्ये पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासंबंधी कायमस्वरूपी व्यवस्था असावी, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. याप्रकरणी सविस्तर शपथपत्र दाखल करण्यासाठी दोन्ही विभागांनी वेळ मागून घेतला. पुढील सुनावणी मार्च रोजी ठेवली. 

शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने थकित वीज बिलामुळे खंडित केला होता. याविरोधात समीर राजूरकर यांनी अॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. भविष्यात अत्यावश्यक नागरी सुविधा खंडित करण्याचे आदेश महावितरण, मनपा, राज्य शासनाला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या प्रकरणी दि. फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही उपस्थित केला होता. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असतानाही शहरवासीयांना पुरेसा पाणीपुरवठा का केला जात नाही, तसेच शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठाच होत नसल्याने गोरगरीब नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागते, असे खंडपीठानेच निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी महापालिकेस तोंडी म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

बुधवारी (२२ फेब्रुवारी) या संदर्भात खंडपीठाने विचारणा केली असता, सविस्तर उत्तर दाखल करण्याकरिता महापालिकेच्या वतीने वेळ मागून घेण्यात आला. तसेच मनपा आयुक्त आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून शहरवासीयांची माफी मागितल्यासंदर्भात कागदपत्रे खंडपीठात सादर केली. शासनाच्या वतीने सरकारी वकील अॅड. अमरजितसिह गिरासे यांनी, नगरविकास खात्याच्या माध्यमातून महापालिका आणि महावितरण याना एकत्र आणून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. यावर खंडपीठाने, हा प्रश्न फक्त या बिलासंदर्भात नसून वारंवार उद्भवणारा असल्याने कायमस्वरूपी तोडगा आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. याचिकाकर्ते माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्या वतीने अॅड. देवदत्त पालोदकऱ, महावितरणतर्फे अॅड. अनिल बजाज, महापालिकेच्या वतीने अॅड. राजेंद्र देशमुख, तर शासनाच्या वतीने अॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. 

दोन दिवस दुरुस्ती, पाच दिवस पाणीप्रश्न 
मनपाच्या यांत्रिकी शाखेने रोहित्रावर डीव टाकून पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित्र सुरू होत नसल्याने अन्य विभागाच्या तज्ज्ञांकडून यांत्रिकी शाखेने पाहणी करून घेतली. तेव्हा रोहित्रच निकामी झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मनपाकडून जलदगतीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यासाठी किमान दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास पाच दिवस लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. 

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न 
शॉर्टसर्किटमुळे रोहित्र निकामी झाले आहे. अन्य रोहित्र असून त्याचीही दुरुस्ती केली जात आहे. एक-दोन दिवसांत काम होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अन्य ठिकाणाहून तात्पुरते कनेक्शन घेता येईल का, याचे नियोजन करण्यात येत आहे.
- यू. जी. शिरसाट, उपअभियंता, जायकवाडी यांत्रिकी विभाग 

८० एमएलडी पाणी येण्याची शक्यता 
फारोळा केंद्रातून केवळ तीन पंपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सकाळपर्यंत केवळ ८० एमएलडी पाणी येऊ शकते. एरवी जायकवाडीतून १५६ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यापैकी शहरात प्रत्यक्ष १२५ एमएलडी पाणी येते. जायकवाडीतून पाच पंपांनी उपसा करून फारोळा केंद्रात पाठवण्यात येतो. मात्र, फारोळ्यात केवळ तीनच पंप सुरू आहेत. येणारे पाणी जास्त अाहे तर फारोळ्याची तेवढी साठवण क्षमता नाही. त्यामुळे जायकवाडीचे दोन पंप बंद करण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...