आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हाइट टॉपिंग: १० इंच जास्तीचा थर, पुंडलिकनगर रस्त्याच्या कामाला प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाकडून मिळालेल्या २४ कोटी रुपयांतून दोन रस्ते पूर्ण करण्यात आले. मात्र, भूमिगतच्या कामामुळे गजानन महाराज मंदिर ते तिरुमला मंगल कार्यालय आणि कडा ऑफिस ते जवाहरनगर पोलिस ठाणे चौक हे दोन रस्ते अपूर्ण राहिले. नगरसेवक राजू वैद्य यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामांना नऊ महिन्यांच्या खंडानंतर गुरुवारपासून प्रारंभ झाला. ठेकेदाराकडून पंधराऐवजी पंचवीस इंच जाडीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.
हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते एका बाजूने पूर्ण करण्यात आले आहेत. मात्र, भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे सहाशे मीटर अंतराचे काम रखडले. यावर तात्पुरती माती टाकून भूमिगतच्या ठेकेदाराने खड्डे बुजवले. मात्र, या थातूरमातूर कामावर सिमेंट रस्ता तयार करण्यास ठेकेदाराने हरकत घेतली होती. सात फूट खोल उखडलेल्या खड्ड्यांवर रस्ता तयार करण्यासाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पुण्याच्या संस्थेकडून विशेष डिझाइन तयार करून घेतले होते. त्या डिझाइननुसार रस्ता खोदून त्यावर अगोदर मोठी खडी, नंतर बारीक खडी, त्यावर खच आणि डांबराचा प्राथमिक थर टाकून बुजवून घेतले. त्यानंतर त्यावर डांबर रस्ता तयार करण्यात आला आहे. दोन महिन्यांनंतर काही प्रमाणात रस्ता पूर्ववत झाल्याचे गृहीत धरून व्हाइट टॉपिंगचा रस्ता तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गुरुवारी कामाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यकारी अभियंता सिकंदर अली, ठेकेदार आणि सल्लागार समितीच्या सदस्यांनी पुंडलिकनगर रस्त्याची पाहणी केली. तिरुमला मंगल कार्यालयाकडून गजानन महाराज मंदिर चौक असा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

२५ इंच जाडीचा असणार रस्ता : भूमिगतनेरस्ता खोदल्याने रस्त्याचा पाया खचला होता. त्यामुळे व्हाइट टॉपिंगचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्यांना हवा तसा पाया तयार केला आहे. मात्र, त्यावर टिकाऊ रस्ता तयार करण्यासाठी पुण्याच्या संस्थेने जो रस्ता डिझाइन करून दिला आहे त्यानुसार रस्त्याची जाडी २५ इंच करण्यात येणार आहे. आधी ती १५ इंच करण्याचे ठरले होते. यात सिमेंटच्या प्राथमिक थरासह मुख्य थराच्या जाडीचाही समावेश आहे. दरम्यान, या रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या दिवशीपासून पाठपुरावा सुरू आहे. दोनदा भूमिगत आणि व्हाइट टॉपिंगचे काम करणाऱ्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा आयुक्तांकडेही नियमित पाठपुरावा केल्याने आज कामाला प्रारंभ झाला, असे नगरसेवक राजू वैद्य म्हणाले.

पुंडलिकनगर रस्त्याला प्राधान्य
पुंडलिकनगर रस्ता आधी तयारी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारपासून लेव्हल करण्याचे काम सरू करण्यात आले. त्यानंतर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...