आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉइन शॉपी प्रकरण : पहिल्याच दिवशी 86 महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वैजापूर - शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील परवानाधारक अजंठा वाइन शॉप दुकान परिसरातून कायमस्वरूपी हटवण्यासाठी संघर्षाची झुंज देणाऱ्या महिलांच्या कायदेशीर लढाईवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शनिवारपासून एकूण ४५२ महिलांनी दाखल केलेल्या लेखी तक्रार अर्जांवर  तक्रारदार महिलांची प्रत्यक्षात स्वाक्षरी पडताळणी प्रक्रिया हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी ८६ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून रविवारी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.  
 
देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या दारूबंदी निर्णयानंतर येथील अजंठा वाइन शॉपचे परवानाधारक विकेते पंढरीनाथ चव्हाण यांनी त्यांचे परवाना असलेले मद्य विक्री केंद्र प्रभाग क्रमांक तीनमध्ये स्थलांतरित केले होते. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था तसेच शांतता भंग होईल यामुळे परवानाधारक चव्हाण यांनी दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आनंदीबाई अन्नदाते, माजी शहरप्रमुख शिवलिंग साखरे, दिलीप निखाडे, भाजपचे महेश भालेराव यांच्यासह परिसरातील नागरिक व महिलांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली होती. उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महिलांनी मद्य विक्री दुकान बंद करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी धडक मोर्चा काढून दुकान बंद न झाल्यास प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महेश भालेराव यांनी प्रशासनाला दिला होता. प्रभागातील दारू विक्री बंद करण्यासाठी एकूण १ हजार ६९२ महिला मतदारांपैकी ६३२ महिलांनी त्यांच्या स्वाक्षरीने राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी दोन दिवसांची प्रक्रिया फुलेवाडी रोडवरील लोकमान्य शाळेत घेण्यात आली. पहिल्या दिवशी महिलांच्या स्वाक्षरी पडताळणीत एकूण ६३२ महिलांपैकी १७३ नावे इतर प्रभागांतील असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची स्वाक्षरी पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही, असे स्पष्ट करत उर्वरित ४५२ महिलांच्या स्वाक्षरी पडताळणी प्रक्रियेत पहिल्या दिवशी ८६ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यात आली. रविवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.   
 
सकाळी दहा वाजेपासून स्वाक्षरी पडताळणी प्रक्रियेसाठी लोकमान्य शाळा परिसर गजबजून गेला होता. दारू विक्री बंदीसाठी पुढाकाराची भूमिका घेतलेले पदाधिकारी या ठिकाणी तळ ठोकून होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिवाजी वानखेडे याच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक रावसाहेब कोरे, आर. एस. बोधनवाड यांनी ही प्रक्रिया हाती घेतली आहे.
 
१७३ नावांवरून किरकोळ गदारोळ   
प्रभाग क्रमांक तीनमधील दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी एकूण ६३२ महिलांनी लेखी आक्षेप अर्ज प्रशासनाकडे दाखल केला होता. त्यात १७३ महिलांची नावे या प्रभागातील मतदार यादीत नसल्यामुळे पडताळणीतून बाजूला करण्याच्या धोरणावर आनंदीबाई अन्नदाते यांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे थोड्या वेळासाठी प्रक्रियेचे वातावरण तापले होते. दारू विक्रीला १७३ महिलांचा विरोध असल्याचे नोंदवून घेण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे प्रक्रियेत पडताळणीव्यतिरिक्त विरोध म्हणून नोंद घेण्यात आल्याचे अधिकऱ्यांनी सांगितले.  
 
परवानाधारकाचा पडताळणीवर आक्षेप   
महिलांच्या स्वाक्षरी पडताळणी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये तक्रारदार महिलांऐवजी या प्रकरणाशी संबंध नसलेल्या महिला पडताळणी प्रक्रियेत स्वाक्षरी करत असल्याचा लेखी आक्षेप परवानाधारक विक्रेते पंढरीनाथ चव्हाण यांनी नोंदवला. या प्रभागात सध्या रहिवासी नसलेल्या व पडताळणी यादीत नाव नसलेल्या महिलेच्या नावाने सह्या करण्यात आल्याचा लेखी आक्षेप अर्ज चव्हाण यांनी राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दाखल केला. दरम्यान, पडताळणी प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी आक्षेप अर्ज वरिष्ठांकडे निर्णयासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.  
 
मतदानासाठी ४२४ अंकांची पडताळणी महत्त्वाची ठरणार  :  परिसरातील दारू विक्रीची बाटली आडवी करण्यासाठी सरसावलेल्या ४५२ महिला पैकी ४२४ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी होणे गरजेचे आहे. हा आकडा पार झाल्यास दारू दुकान बंदीसाठी मतदान प्रक्रिया वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करता येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी दिली. पहिल्या दिवशी ८६ महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी झाली.
बातम्या आणखी आहेत...