आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्दाफाश : गंभीर गुन्ह्यातील तपासाच्या शास्त्रोक्त पद्धतीचाच पोलिसांनी केला 'खून'..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात एका ठिकाणी खून झाल्यानंतर तपासासाठी तत्काळ श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथक दाखल झाले. घटनास्थळी एक कानटोपी पडलेली होती. ती उचलून श्वानाला हुंगायला द्यायची होती. मात्र, टोपी उचलण्यासाठी पथकाकडे हँडग्लोव्हज नव्हते. मग काय? पथकातील एका कर्मचाऱ्याने चक्क बाजूलाच कचऱ्यामध्ये पडलेला एक न्यूजपेपर घेतला अन् त्याद्वारे टोपी उचलली. पेपरमध्ये पकडलेली टोपी श्वानाला हुंगायला दिली अन् श्वान पुढे निघाला...! अशी आहे औरंगाबाद पोलिसांची तपासाची पद्धत. आता त्या श्वानाला नेमका टोपीचा वास आला की पेपरचा, हे एक कोडेच आहे. अशा पद्धतीने खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांकडून तपासाच्या शास्त्रोक्त पद्धतीचाच "खून' केला गेला. 

या गंभीर प्रकाराचा व्हिडिओ डीबी स्टारच्या हाती लागला. रेल्वेस्टेशन परिसरामध्ये १० जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलाचा खून झाला होता. लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ शहर पोलिसांच्या श्वानपथकाला बोलावले. घटनास्थळावर आरोपीने हाताळलेली एखादी वस्तू पडलेली असेल तर त्या श्वानाला हुंगायला दिली जाते. त्या वस्तूच्या वासाआधारे श्वान आरोपीचा माग काढतो. त्यानुसार येथे श्वानपथकाने घटनास्थळावर रक्ताने माखलेली एक कानटोपी श्वानाला हुंगायला दिली होती. मात्र, ती टोपी हाती घेऊन श्वानाला हुंगायला देण्यासाठी श्वानपथकाकडे हँडग्लोव्हजदेखील नव्हते. बाजूलाच कचऱ्यात पडलेल्या एका पेपरच्या साह्याने ती टोपी उचलून श्वानाला हुंगायला देण्यात आली. यात श्वानाने नेमका टोपीचा वास घेतला की त्या कचऱ्यातील पेपरचा, हे आता अचूकपणे सांगता येणार नाही. नियमानुसार येथे हँडग्लोव्हज घालूनच घटनास्थळावरच्या वस्तू हाताळायला हव्या होत्या. श्वानालाही वस्तू हुंगायला देताना ती वस्तू हँडग्लोव्हज घातल्यानंतरच हातात घ्यावी लागते. 

निदान गांभीर्य तरी ओळखावे 
खुनाची घटना म्हणजे साधीसुधी नाही आणि तीही एका अल्पवयीन मुलाच्या खुनाची. साध्या किरकोळ गुन्ह्यात पोलिसांनी अशा पद्धतीने केलेला हलगर्जीपणा धकू शकतो. मात्र, खुनासारख्या गंभीर घटनांच्या तपासामध्येही पोलिस शास्त्रोक्त पद्धतीला फाटा देत असतील तर तपासातील अचूकतेवर नक्कीच प्रश्नचिन्ह उभे ठाकू शकते. या घटनेमध्ये जो पेपर श्वानपथकातील कर्मचाऱ्याने पुरावा उचलण्यासाठी वापरला, तो किती जणांनी हाताळलेला असेल, किमान याचा तरी साधा विचार पोलिसांनी करायला हवा होता. 

आरोपीचा शोध नाही 
१० जानेवारी रोजी रेल्वेस्टेशन परिसरात खून झाला होता. या घटनेचा तपास लोहमार्ग पोलिसांकडे आहे. आता या घटनेला महिना होत आला तरीही यातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. जर पंचनाम्यापासूनच तपासातील सर्व प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केल्या असत्या तर कदाचित आरोपी सापडू शकले असते. पेपरमध्ये पकडलेली टोपी श्वानाला हुंगवली आणि श्वान पुढे चालता झाला. पेपरमध्ये पकडलेली टोपी या छायाचित्रात अगदी स्पष्ट दिसत होती. 

कशी असते शास्त्रोक्त पद्धत? 
फॉरेन्सिक सायन्सनुसार एखादी घटना घडल्यानंतर अगोदर घटनास्थळ निर्मनुष्य करायला हवे. जेणेकरून कुणाच्या अंगावरचे केस तिथे पडणार नाही. पायांचे, बूट-चपलांचे ठसे पुसणार नाहीत, रक्ताचे डाग अथवा एखादी बारीक वस्तू डिस्टर्ब होणार नाही. त्यानंतर पुरावे गोळा करताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी हँडग्लोव्हज, डोक्यामध्ये टोपी घातलेली पाहिजे. शक्य असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. श्वानाला जर एखादी वस्तू हुंगायला द्यायची असेल तर ती हँडग्लोव्हज असल्याशिवाय उचलूच नये. कारण अन्य कपड्याच्या, कागदाच्या साह्याने ती वस्तू उचलल्यास तिचाही वास त्यात मिसळतो आणि श्वान तिसरीकडेच भरकटण्याची शक्यता असते. कचऱ्यातील पेपरच्या साह्याने वस्तू उचलून श्वानाला हुंगायला देणे, ही पद्धत तर हास्यास्पद आहे.
-डॉ. एस. जी. गुप्ता, संचालक,फाॅरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट 

चौकशी करणार 
पोलिस प्रशासनाकडून सर्व पोलिस ठाणे आणि श्वानपथकाला हँडग्लोव्हज इतर साहित्य पुरवले जाते. जर हे साहित्य संपले असेल तर ठाण्यांनी आणि श्वानपथकाकडून आम्हाला मागणी कळवली जाते. त्यानंतर आम्ही पुरवठा करतो. याशिवाय काही वस्तू खरेदी करून त्याचे बिल जमा केले तरीही त्याचे पैसे दिले जातात. नियमानुसार तपासावेळी पुरावे हाताळताना हँडग्लोव्हज घालावेच लागतात. रेल्वेस्टेशनच्या खून प्रकरणात हँडग्लोव्हज का वापरले नाहीत, याबद्दल चौकशी करू.
-संदीप आटोळे, पोलिसउपायुक्त, मुख्यालय 

त्यावेळी पर्यायच नव्हता 
आम्हाला बऱ्याच दिवसांपासून पोलिस प्रशासनाकडून हँडग्लोव्हज मिळालेले नाहीत. ग्लोव्हजची किंमत कमी असल्याने आम्ही नेहमी स्वखर्चातून खरेदी करून ठेवतो. फक्त रेल्वेस्टेशनच्या खुनावेळीच आमच्याकडे ग्लोव्हज नव्हते. त्यामुळे आम्हाला पेपरमध्ये पुरावा उचलून श्वानाला हुंगायला द्यावा लागला.
श्वान पथकातील कर्मचारी 
 
पुढील स्लाइडवर पाहा, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ, त्यानंतर पाहा PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...