आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येळगंगेतील बंधारा गेला वाहून, ९ लाख ८० हजार गेले पाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ परिसरातील येळगंगेतील निकृष्ट दर्जाचा सिमेंट नाला वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्यांतील साठलेले पाणी वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. छाया: शेख जमीर - Divya Marathi
वेरूळ परिसरातील येळगंगेतील निकृष्ट दर्जाचा सिमेंट नाला वाहून गेला. त्यामुळे बंधाऱ्यांतील साठलेले पाणी वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. छाया: शेख जमीर
खुलताबाद - वेरूळ परिसरातील येळगंगेत बांधलेला सिमेंट नाला अलीकडे झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहून गेला असून शासनाचे नऊ लाख ८० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. जिल्हा परिषद सिंचन उपविभाग कन्नडचे उपअभियंता आणि शाखा अभियंत्यांचे आता पितळ उघडे पडले असून बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रभर पाणी साठवण्याची योजना राबवत असते. सध्या जलयुक्त शिवार ही योजनासुद्धा राबवण्यात येत आहे. यापूर्वीही सिमेंट नाले, माती नाले, गावतळे, शेततळे तयार करण्यात आले आहेत. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले; परंतु शासनाने नियुक्त केलेले अधिकारीच शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचे समोर आले आहे. वेरूळ येथील येळगंगेत बांधण्यात आलेला सिमेंट नाला नुकताच पाण्यात वाहून गेला असून जिल्हा परिषद सिंचन विभागातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. वेरूळ सर्कलचे जि. प. सदस्य शैलेश क्षीरसागर यांच्या शिफारशीवरून वेरूळ सर्कलमध्ये तीन सिमेंट नाले आणि बाजारसावंगी सर्कलच्या जि. प. सदस्यांच्या शिफारशीवरून बाजारसावंगी सर्कलमध्ये एक सिमेंट नाला जिल्हा नियोजन समितीकडून २०१३ मध्ये मंजूर झाला होता. प्रत्येक सिमेंट नाल्याला शासनाच्या वतीने ९ लाख ८० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. जिल्हा परिषद सिंचन उपविभाग कन्नड या विभागांतर्गत वेरूळच्या येळगंगेत २७ मार्च २०१३ रोजी ९ लाख ८० हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बांधला होता. त्याचप्रमाणे कसाबखेडा, चिंचोली येथे प्रत्येकी एक सिमेंट नाला बांधण्यात आला होता. सिमेंट नाले बांधकामाची सर्व जबाबदारी कन्नड जिल्हा परिषद सिंचन उपविभागाचे ए. टी. गायकवाड यांच्यावर होती. विशेष म्हणजे शाखा अभियंता आर. एम. अमृतकर यांच्या देखरेखीत वेरूळ येळगंगेतील सिमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले होते. सिमेंट नाला भिंतीची लांबी १२ मीटर, रुंदी एक मीटर आणि १२ ते १३ फूट खोल होता.

संबंधितांवर कारवाई करण्यात यावी
जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर यांनी संबंधित ठेकेदारांशी हातमिळवणी करून वेरुळ येथील येळगंगेत सिमेंट नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे. यामुळे हा सिमेंट नाला पाण्यात वाहून गेला. त्यामुळे संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी.
प्रकाश पाटील, माजी सरपंच, वेरूळ.
शेतकऱ्यांना मिळायचे पाणी
येळगंगेत सिमेंट नाला बांधण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली होती; परंतु लाखो रुपये खर्च करून बांधलेला हा सिमेंट नाला आता वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उद्भवला आहे.
त्यामुळे बंधारा वाहून गेला
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्यातील गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. साचलेले पाणी क्षमतेपेक्षा जास्त असल्याने सिमेंट नाला पाणी थोपवू शकला नाही. त्यामुळे तो वाहून गेला. कार्यवाही झाली, तर मान्य करावी लागेल.
आर. एम. अमृतकर, जिल्हा परिषद सिंचन उपविभाग, कन्नड.