आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळच्या येळगंगेत साचले लाखो लिटर पाणी; शेतकऱ्यांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- परिसरात मागील काही दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे गाव परिसरातील खरिपाच्या पिकांना तर जीवनदान मिळालेच. त्याशिवाय मागील दोन महिन्यापूर्वी येळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने आजघडीला त्या नदीपात्रात जवळपास दहा लाख लिटर पाणी साचल्याचे पाहावयास मिळत आहे.
या पाण्यामुळे परिसरातील हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
वेरूळ येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या व महेशमाळ (कम्यकवन) येथ्ून उगम पावणाऱ्या येळगंगा नदीचे पात्र दुर्गंधीयुक्त पाणी तसेच अतिक्रमणामुळे लुप्त होत चालले होते. या येळगंगा नदीचा कायापालट करण्यात यावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता; परंतु काही अधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने १३ मार्च रोजी स्वामी शांतीगिरी महाराज, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांच्या उपस्थितीत येळगंगा नदीच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी उद्योजक आनंद असोलकर, निश्चल शेंडे, वैभव किरगत, पुष्पगंध गायकवाड यांच्या पुढाकाराने सहा कि.मी. या नदीवर सर्वांगीण विकासकामे सुरू करण्यात आली. यामध्ये नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. विशेषत: या कामासाठी अनेकांनी भरभरून आर्थिक मदतदेखील केली. त्यामुळे या नदीपात्राचा विकास खऱ्या अर्थाने झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
कामाला हातभार
वेरूळ येथील येळगंगा नदीच्या विकासकामांकरिता जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर, बीडीओ आर. एस. लाहोटी, नाना ठाकरे, उपसरपंच किरण काळे, ग्रामसेवक बी. आर. म्हस्के, संतोष फुलारे, धूत यांचे स्वीय सहायक संजय सुर्वे, विठ्ठल हरकळ आदींनी सहकार्य करत विकास कामात हातभार आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत केली आहे.
अशी मिळाली आर्थिक मदत
नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट १० हजार रुपये, जिल्हा परिषदेच्या २३ कर्मचाऱ्यांनी ५६ हजार रुपये, तर श्री संत जनार्दन स्वामी आश्रम व जय बाबाजी परिवाराकडून १० लाख रोख व श्रमदान करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँक समर्थनगर यांच्याकडून ५ लाख, केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्याकडून ६ लाख, अॅक्सिस बँक ४ लाख रुपये, शासकीय इंधनापोटी ३ लाख, किरण डोणगावकर यांच्याकडून २२ हजार रुपयांची मदत मिळाली. त्यामुळेच हे काम पूर्णत्वास गेले आहे.
बातम्या आणखी आहेत...