आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये निवडणुकीला गालबोट; मतदान केंद्राजवळ दगडफेक, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दगडफेकीत राजेंद्र टेके यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. - Divya Marathi
दगडफेकीत राजेंद्र टेके यांच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले.
वैजापूर- तालुक्यातील धोंदलगाव येथे मतदान केंद्राच्या परिसरात गुरुवारी गोंधळ घालून दगडफेक करणाऱ्या काही भाजप कार्यकर्त्यांवर वैजापूर पोलिसांनी दंगल आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली होती. दरम्यान, धोंदलगाव येथील मतदान केंद्राजवळ गावातील भाजपचे कार्यकर्ते बिपिन साळे, सचिन सोळस, बापू वाघ, संतोष आवारे, संतोष मिसाळ, किसन आवारे यांची बंदोबस्तावर तैनात पोलिसांशी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांचे पर्यवसान दगडफेकीत झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी वरील कार्यकर्त्यांसह इतर तीन ते चार अनोळखीवर सहायक पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मतदान केंद्राजवळ या कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बंदोबस्तावरील पोलिस पथकाला घेराव घालून धक्काबुक्की करत दगडफेक केली. मतदान प्रकियेदरम्यान सामाजिक शांततेचा भंग, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दगडफेकीत राजेंद्र टेके जखमी झाले होते. दरम्यान, धोंदलगाव येथील ग्रामस्थांनी कार्यकर्ते पोलचिटचे वाटप करत असताना पोलिसांनी त्यांना अडवत वादाला तोंड फोडले असल्याचे सांगितल्यामुळे हे प्रकरण राजकीय पटावर चिघळण्याची शक्यता आहे. 
 
उमेदवार वानखेडेंवर २५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा 
सिल्लोड- अंधारी गटातील जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार दादाराव वानखेडे यांच्यावर २५ लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला अाहे. 

अंधारी येथील व्यापारी सुनील सुंदरलाल पाटणी यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवार, दि. १६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दिली. अंधारी येथे रात्री दहा वाजेच्या सुमारास दादाराव वानखेडे यांनी त्यांच्या मोबाइलवरून सुनील पाटणी यांना फोन केला. जिल्हा परिषद निवडणुकीत ५० लाख रुपये खर्च झाले आहेत. मी जर निवडणुकीत हरलो, तर मला २५ लाख रुपये दे. पैसे दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले असून सिल्लोड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सभापतींचे दोन हजार रुपये लुटले 
सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती लताबाई वानखेडे यांच्या बटव्यातील दोन हजार रुपये लुटून त्यांचे पती दादाराव वानखेडे यांना जीवघेणी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीनंतर वादाला सुरूवात झाली असून गुरूवारी रात्री सभापती लताबाई वानखेडे यांच्या बटव्यातील दोन हजार रुपये लुटून त्यांचे पती दादाराव वानखेडे यांना मारहाण केल्याची तक्रार लताबाई वानखेडे यांनी शुक्रवार (दि.१७) रोजी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिली. 

मतदान संपल्यानंतर सिल्लोड येथे निवासस्थानी असताना माझे पती दादाराव वानखेडे हे सुनील पाटणी यांच्याशी मोबाइलवर बोलत होते. केशवराव तायडे यांनी पाटणी यांच्या मोबाइलवरून दादाराव वानखेडे यांना शिविगाळ केली त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या सुमो गाडीतून आलेल्या पाच जणांनी सभापती निवासस्थानी येऊन दादाराव वानखेडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबरदस्तीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला माझ्या बटव्यातील दोन हजार रुपये घेऊन पसार झाले, असे लताबाई वानखेडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अंकुश तायडे, योगेश तायडे, संदीप सोनवणे इतर दोन जणांवर मारहाण करणे, पैसे लांबवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील संदीप सोनवणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...