आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदस्याच्या हाती पेट्रोलची बाटली पाहून अडकला सभागृहाचा श्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषद शाळांतील जागा रिक्त असूनही आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेतले जात नाही, शिक्षकांच्या बदल्या कधी करता ते सांगा, अन्यथा मी काहीही करेन, असे म्हणत जिल्हा परिषदेच्या आपेगाव (ता. गंगापूर) सर्कलच्या सदस्या पुष्पा जाधव यांनी पेट्राेलची बाटली दाखवताच जिल्हा परिषदेच्या सभागृहातील उपस्थित सर्वच जण थक्क झाले होते. सर्वांनी बराच वेळ समजावल्यानंतर जाधव यांचा पारा उतरला.
शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभा सुरू होताच जाधव यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्या म्हणाल्या, सांगली जिल्हा परिषदेचे एक शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळवण्यासाठी खेटे घालत होते. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या गेटजवळ ते मरण पावले. त्या वेळी त्या जिल्हा परिषदेने आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे २४ तासांत मार्गी लावली. अशीच प्रकरणे आपल्या जिल्हा परिषदेत बाकी आहेत. खासगी शिक्षकांचे आधी समायोजन करून घेतले, परंतु आंतरजिल्हा बदलीने पती-पत्नी एकत्रीकरणासाठी, आजारी शिक्षक जिल्ह्यात येण्यासाठी दोन वर्षांपासून प्रतीक्षा करत असूनही शिक्षण विभाग त्यांची दखल घेत नाही. आपल्याही जिल्ह्यात एखाद्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यावरच जिल्हा परिषदेला जाग येईलका, असा प्रश्न त्यांनी केला. मला दोन दिवसांत यावर निर्णय हवा आहे, असे सांगत त्यांनी सभागृहाला पेट्रोलची बाटली दाखवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच जण हैराण झाले.

खुलाशावरसमाधान नाही
कितीशिक्षकांच्या बदल्या बाकी आहेत? बदल्या कधी होतील? असे प्रश्न महाजन यांनी शिक्षणाधिकारी एस. मोगल यांना विचारले. मोगल म्हणाले, ३१ मार्चपर्यंत जाणाऱ्या शिक्षकांना एनओसी देण्यात येणार आहे. ते गेल्यानंतरच येणाऱ्या शिक्षकांना एनओसी देण्यात येईल. मात्र, या खुलाशावरही जाधव यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे महाजन, बापू काळे, मनाजी मिसाळ, शिक्षण सभापती विनोद तांबे, सभापती संतोष जाधव यांनी जाधव यांची समजूत घातली. शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे, असे बजावत जाधव आपल्या जागेवर विराजमान झाल्या.
झेडपी सदस्य जाधव यांनी पेट्रोलची बाटली हाती घेऊन जाब विचारला.

शुक्रवारी झालेली जिल्हा परिषदेची सभा वादळी ठरली. पीआरसीच्या दौऱ्याचा खर्च, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांच्यावरील आक्षेप आदी विषयांवर सभेत वादळी चर्चा झाली. छाया : रवी खंडाळकर

जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा योजना विकासकामात अडथळे आणत असल्याचा ठपका ठेवत पदभार काढून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित चौधरी यांना दिले.

मीकसा निर्णय घेऊ ? : महाजनयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांना यावर निर्णय घेण्याचे सांगितले. त्यावर लगेच कसा निर्णय घेऊ, असे उत्तर चौधरी यांनी दिले. मात्र, स्पष्ट गाइडलाइन असूनही मार्गदर्शन मागवता, तुम्हाला अधिकार नाहीत का? असे राजपूत यांनी सुनावले.

चर्चाविफल : बेदमुथायांचा पदभार काढण्याचा निर्णय प्री जीबीत महाजन यांच्या दालनात झाला होता. सभागृहात हा विषय सुरू असताना महाजन यांनी १५ मिनिटांसाठी बैठक तहकूब केली. बेदमुथा यांना बाहेर बोलावून महाजन यांनी त्यांच्याशी विशेष चर्चा केली. मात्र, ती विफल झाल्याने बैठक सुरू होताच बेदमुथांचा विषय सभागृहासमोर आला.

दरम्यान, प्रशासनाची बाजू सांभाळत बेदमुथा यांनी चांगले कामे केल्याचा पाढा चौधरी यांनी सुरू केला. मात्र, काही सदस्यांनी म्हणताच कशाला बोलू द्यायचे? असे म्हणत सदस्यांनी चौधरी यांच्या स्पष्टीकरणालाही विरोध केला. त्यामुळे नाइलाजाने चौधरी यांना शांतच राहावे लागले.
जिल्हा परिषदेच्या जमा- खर्चाचा आढावा घेण्यासाठी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पंचायत राज समितीतील (पीआरसी) १५ आमदारांचे पथक शहरात आले होते. त्यांचा खर्च विधिमंडळाकडून करण्यात येतो. त्यानंतरही या समिती सदस्यांवर दोन दिवसांत १५.५० लाखांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले. खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांना नियमांची आठवण करून देत सदस्यांनी या खर्चाला मान्यता दिली नाही. दीपकसिंग राजपूत, मनाजी मिसाळ, डॉ. सुनील शिंदे, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोटे, संतोष माने या सदस्यांनी शासनाच्या मार्गदर्शनाशिवाय या विषयास मंजुरी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.