आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत जमले, औरंगाबाद झेडपीत युतीचा निर्णय बुधवारनंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुंबई महानगरपालिकेत युतीचे काय होणार, असा प्रश्न निकालापासून सर्वांच्या मनात होता. तेथे भाजपने माघार घेतली अन् शिवसेनेचा महापौर होणार हे नक्की झाले. आता औरंगाबाद जिल्हा परिषदेत काय होणार, याची उत्सुकता ग्रामीण भागात ताणली गेली आहे, परंतु आम्हाला श्रेष्ठींकडून कोणताही आदेश नसल्याचे सेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे, तर निवडणुकीला अजून अवकाश आहे, मार्चनंतर बोलणी सुरू करू, असे भाजपने म्हटले आहे. 

६१ सदस्यांच्या सभागृहात या वेळी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांची सदस्य संख्या २३ इतकी झाली आहे. पूर्ण बहुमत नसल्याने त्यांना अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना किंवा अन्य पक्षाची मदत लागेल. मुंबई महानगरपालिकेतही असेच काहीसे चित्र होते. तेथे भाजपने सपशेल माघार घेत उमेदवार देण्याबरोबरच युतीसाठी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी सेनेचा अजेंडा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत जे घडले तसेच औरंगाबादेत झाले अन् सेनेने माघार घेतली तर भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे. सेनेने भाजपबरोबर युती केली तर मात्र उपाध्यक्षपद त्यांना मिळू शकते. त्यामुळे नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

१४ मार्चनंतर होईल चर्चा 
मुंबईमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर युतीबाबत चर्चा होऊ शकते, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जुन्या मित्रांमध्ये १४ मार्चनंतरच चर्चा होईल. १४ मार्चला पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक होत आहे. यात वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री आणि सिल्लोड या चार तालुक्यांत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. तेथे भाजपला सेनेच्या मदतीचीही गरज नाही. गंगापूर, कन्नड, सोयगाव आणि औरंगाबाद या चार तालुक्यांत भाजप क्रमांक एकवर तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. तालुका पातळीवर नेमके काय करायचे याचा निर्णय तेथेच घेतला जाणार आहे. १४ मार्चला जेव्हा ही निवडणूक होईल, तेव्हा भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे चित्र समोर येईल आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू होईल. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. 

मार्चनंतर बघू 
अजून आम्हालाश्रेष्ठींकडून काहीही आदेश किंवा सूचना नाही. त्यामुळे आजघडीला आम्ही काहीही बोलणार नाही. मार्चनंतर काय ते बघू. अंबादासदानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना. 

अध्यक्ष भाजपचाच 
युतीझाली आणि नाही झाली तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार हे पक्के आहे. युती झाली तर उपाध्यक्षपद सेनेकडे जाऊ शकते, परंतु युती झाली नाही आणि सेनेने उमेदवार दिला तर तिरंगी लढतीत अध्यक्ष उपाध्यक्षपद हे भाजपकडेच असेल. तरी यावरच दोन्ही पक्षांच्या लवकरच बैठका होतील. 

युतीसाठी चर्चा करावी 
मुंबईत भाजपने मन मोठे केले, तसे येथे सेनेने करावे किंवा युतीसाठी चर्चा करावी, आम्ही त्यांना सन्मानाने उपाध्यक्षपद देऊ. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलो असलो तरी त्यांच्यावर अन्याय करणार नाही. एकनाथजाधव, जिल्हाध्यक्ष भाजप. 
बातम्या आणखी आहेत...