आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.च्या विद्यार्थ्यांचे आरोग्य गादीघरांच्या धुळीमुळे धोक्यात, गादीघरे हटवण्याची पालकवर्गातून मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - जिल्हा परिषदेच्या पंढरपूर प्राथमिक शाळा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली असून शाळालगतच्या गादीघरांमधून धूलिकणांसह उडणाऱ्या कापसांच्या दोऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संबंधित हा प्रश्न असल्याने पालकांच्या भावना लक्षात घेऊन परिसरातील गादीघरांचे अतिक्रमित व्यवसाय तत्काळ हटवण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने करण्याची मागणी पालक वर्गातून पुढे येत आहे. 
 
येथील नगर-औरंगाबाद महामार्गाला लागून जिल्हा परिषदेची पंढरपूर प्राथमिक शाळा आहे. या शाळेत मराठी विभागातून ९५० तर उर्दू विभागातून २०२ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची १७ शिक्षक संख्या आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शेतकरी-शेतमजूर, कामगार, मजूर अशा गरिबांच्या मुलांचाच मोठा भरणा आहे. शाळेच्या अपुऱ्या खोल्यांमुळे अनेक वर्गातील विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून ज्ञानार्जन करावे लागते. नगर-औरंगाबाद मुख्य महामार्गालगत असल्यामुळे अनेकदा महामार्गावरील वाहनांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येण्याचे प्रकार घडतात. 
 
गादी घरांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा : शाळेलगतअतिक्रमण करणाऱ्यांमध्ये ते १० व्यावसायिक गादी तयार करणारे आहेत. हे व्यावसायिक गाद्या तयार करताना कापूस सर्व बाजूंनी सारखा पसरण्यासाठी गाद्यांना काठीने बडवतात. त्यामुळे या गाद्यांमधून धूळ कापसाचे बारीक दोरे बाहेर पडतात. ही धूळ कापसाचे बारीक दोरे हवेमध्ये मिसळून शाळेकडे जातात. अगदी डोळयांनाही ते दिसून येत नाहीत.
 
 मात्र, श्वासनलिकेद्वारे ते विद्यार्थ्यांच्या शरीरात जातात. त्यातून शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता पालक वर्गातून व्यक्त होत अाहे. त्यामुळे हा जीवघेणा प्रकार ग्रामपंचायत प्रशासन केव्हा थांबवणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांमधून विचारला जात आहे. शाळेलगतची सर्व अतिक्रमणे हटवून ग्रामपंचायत प्रशासनाने शाळा इमारत पूर्णपणे पूर्वीसारखी मोकळी करावी, अशी मागणी केली जात आहे. 
 
- राजकर्त्यांची मुले शिकण्यासाठी असती, तर संबंधितांनी तातडीने लक्ष घातले असते. मात्र, या शाळेत तर गरिबांची मुले शिकतात ? परंतु निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नावर आम्ही लढा देणार. -कमलेश इंगळे, उपाध्यक्ष, शालेय समिती, 
 
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत होणारी काळजी तितकीच महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून ही दुकाने हटवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. -भारती साळवे, अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती, पंढरपूर 
 
-गाद्यांच्या बडवण्यामुळेत्यातून निघणारी धूळ कापसाचे बारीक दोरे हे श्वसननलिकेद्वारे शरीरात जातात. त्यापासून दमा, सर्दी, निमोनियांसह श्वसननलिकेचे आजार जडू शकतात. बचाव करणे महत्त्वाचे ठरेल. -डॉ.अनिल गंगवाल, लीला नर्सिंग होम 
 
ग्रामपंचायतीने बजावल्या नोटिसा 
-जिल्हा परिषद शाळेलगतची अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने संबंधितांना आठवड्यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमणे मर्यादित होती. ती वाढत गेली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत भारती साळवे, कमलेश इंगळे आदींसह पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. -गौतम चोपडा, सरपंच, ग्रामपंचायत पंढरपूर  येथील प्राथमिक शाळेलगतच्या गादीघरांमधील धूलिकणांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. 

येथील नगर-औरंगाबाद महामार्गाला लागून शाळेची इमारत आहे. पूर्वी शाळा मुख्य महामार्गावरून पूर्णपणे दिसून येत होती. मात्र, कालांतराने शाळेलगतच्या परिसरात चहूबाजूंनी अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. अनेक व्यावसायिकांनी शाळालगत अतिक्रमण करून विविध व्यवसाय थाटले आहेत. या व्यवसायांमुळे शाळा पूर्णपणे झाकून गेल्याने दिसेनाशी झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...