आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न महामंडळाकडून निकृष्ट गव्हाचा पुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीयअन्न महामंडळाकडून राज्यभरातील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाचा गहू पुरवला जात असल्याचे आढळून आले आहे. निकृष्ट दर्जाच्या गव्हाची उचल करू नयेत, असे लेखी आदेश राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने दिले असले तरी त्यापूर्वीच हा गहू रेशन दुकानात येऊन पडला आहे. दुष्काळात तेरावा महिना अशीच अवस्था ग्राहकांची झाली असून ते रेशन दुकानातून रिकाम्या हाताने परत येत आहेत. अनेकांना नाइलाजाने खुल्या बाजारातील महागडा गहू खरेदी करावा लागत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या गहू, तांदळाचा भारतीय अन्न महामंडळाकडून(एफसीआय) पुरवठा केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेच्या लाभार्थीसाठी दरमहा५,८३५ मेट्रीक टन गव्हाचा पुरवठा केला जातो. एफसीआयच्या मनमाड डेपोतून येणारा गहू जाधववाडीतील गोदामात उतरवून घेतला जातो. त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार त्याची उचल करतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर दमदार पाऊस झाला. या पावसात एफसीआयचा गहू गोदामात पोहोचण्यापुर्वीच पावसात ओला झाला. हा ओला गहू गोदामातून रेशन दुकानात पोहोचला. स्वस्त धान्य दुकानात गहू आल्याचे समजताच ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. मात्र, गोण्या फोडताच गहू ओलसर बुरशीयुक्त असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे गव्हावरील बुरशीमुळे कुजल्यागत दुर्गंधी येत होती. अनेक ग्राहकांनी दुकानदारांशी वादावादी करुन रेशनचा गहू नाकारत बाजारातील महागडा गहू घेणे पसंत केले.

पुरवठा विभागाचे वरातीमागून घोडे....
निकृष्ट गव्हाबाबत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ओरड करताच अन्न नागरी पुरवठा विभागास जाग आली. या विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीत २२ जून रोजी तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी तक्रारीत तथ्य असल्याची कबुली देत कक्ष अधिकारी हेमंत वाडीकर यांच्या स्वाक्षरीचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे लेखी आदेश काढले. या आदेशात स्पष्ट केले आहे की, एफसीआयच्या निकृष्ट गव्हाची उचल करण्यात येऊ नये. मात्र, हे पत्र पुरवठा अधिकाऱ्यांच्या हातात पडण्यापुर्वीच त्यांनी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना गव्हाचे वितरण केले होते. शासनाचे पत्र हाती पडताच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी देखील तत्परता दाखवत मनमाड, जळगाव औरंगाबाद डेपोच्या वाहतूक प्रतिनिधींना निकृष्ट गहू उतरवून घेण्याबाबत आदेश दिले.

गहू बदलून देण्यासाठी प्रयत्न...
स्वस्त धान्य दुकानात आलेला गहू निकृष्ट दर्जाचा असून ओला असल्याने ग्राहक खरेदी करीत नाहीत. बुरशीयुक्त गहू दुकानातच पडून

असल्याने नाहक भूर्दंड दुकानदारांना सोसावा लागत आहे. राज्य शासनाने दुकानदारांच्या तक्रारीवरुन लेखी पत्र काढले. दुकानातील गहू शासनानेच नेऊन चांगला गहू द्यावा यासाठी दबाव आणू. डी. एन. पाटील, राज्य अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार महासंघ

निकृष्ट गव्हाची उचल नाहीच..
एफसीआयकडून निकृष्ट गव्हाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या गव्हाची कोणत्याही परिस्थितीत उचल करू नये अशा स्पष्ट सूचना

आम्ही गोदाम निरीक्षकांना दिल्या आहेत. निकृष्ट गहू उचल केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. संजय जाधवर, जिल्हा पुरवठा अधिकारी

या खेळीमागे दुकानदारच
अन्नधान्याचापुरवठा करण्यापूर्वी महामंडळाकडून गुणवत्ता तपासून वितरण केले जाते. त्यामुळे निकृष्ट गव्हाचा पुरवठा करणे शक्यच.
नाही. दुकानदारांकडून निकृष्ट गव्हाच्या तक्रारी करण्यामागे काहीतरी हेतू असावा असे वाटते. प्रवीण वर्मा, सहायकमहाप्रबंधक, एफसीआय, मनमाड डेपो