आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव पडताच शेतकर्‍यांनी बंद पाडला कांदा लिलाव, बाजार समिती कार्यालयावर मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - लिलावादरम्यान व्यापार्‍यांच्या अपुर्‍या संख्येमुळे कांद्याला कमी भाव आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रविवारी कांद्याचे लिलाव बंद पाडले. तसेच बाजार समिती कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

रविवारी व बुधवारी लासूर स्टेशन येथील बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव होतो. रविवार, 27 रोजी मोठय़ा प्रमाणात कांदा विक्रीस आला होता, परंतु व्यापार्‍यांची संख्या कमी असल्याने मोजक्याच व्यापार्‍यांनी कांद्याला कमी दर दिला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. सर्व कांदा व्यापार्‍यांनी लिलावात हजर राहून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली. यावर सभापती कृष्णा पा. डोणगावकर व सचिव रामेश्वर काकडे यांनी शेतकर्‍यांना इतर कांदा बाजारपेठेतील भावाचे इंटरनेटवरून मुद्रित केलेले पत्रक दाखवले.

यानंतर बाजार समितीने लक्ष घालून व्यापारी व शेतकर्‍यांत मध्यस्थी केल्यानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. पावसाचे वातावरण बनल्याने काही कांदा व्यापारी लिलाव सोडून गेल्याने मोजकेच व्यापारी शिल्लक राहिले होते. व्यापार्‍यांमुळेच कांद्याला कमी भाव मिळत असल्याच्या गैरसमजातून शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडला, असे कांदा व्यापारी कैसर बागवान यांनी सांगितले. सुरुवातीपासून व्यापार्‍यांकडून 1800 ते 2100 रुपयेपर्यंत चांगल्या कांद्याला भाव मिळाला. रविवारच्या कांदा बाजारात सतरा हजार गोण्यांची आवक होती.