आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनगरा मारहाण; सीबीआय चौकशीसाठी ग्रामस्थांची औरंगाबाद हायकोर्टात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कनगरा (जिल्हा उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना मारहाण केल्याच्या घटनेचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशा मागणीची याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी राज्य गृहविभागाच्या प्रधान सचिवांनी तत्काळ सविस्तर अहवाल बुधवारी (9 जुलै) सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती पी.आर. बोरा यांनी दिले.

कनगरा गावातील अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. ग्रामस्थांनी पकडलेली दारू पोलिसांनी सांडून टाकली. राग अनावर झालेल्या ग्रामस्थांची कॉन्स्टेबलसोबत धरपकड झाली. यात कॉन्स्टेबलने पोलिस निरीक्षकांना खोटी माहिती देऊन ग्रामस्थ दारू विक्रेत्यांच्या बाजूने झाले व पोलिसांवर हल्ला केला, असे सांगितले. पोलिस निरीक्षकांनी काळीपिवळीने गुंड पाठवून ग्रामस्थांना मारहाण केली. पोलिस अधीक्षकांनाही ग्रामस्थ विरोधात गेल्याचा निरोप पाठवून जास्तीची कुमक मागवून घराघरांत घुसून ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण केली.

प्रकरणाच्या काही दिवसांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कनगरा ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गावाला भेट दिली होती. या प्रकरणात तीन कॉन्स्टेबल व एका सहायक पोलिस निरीक्षकास निलंबित करण्यात आले. नांदेडच्या पोलिस महानिरीक्षकांनी प्रथमदश्रनी पोलिसच घटनेस जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे.

प्रकरणात अभिमन्यू रावण इंगळे व इतर ग्रामस्थांनी अँड. व्ही. व्ही. इंगळेंमार्फत याचिका दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवून पोलिस अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. खंडपीठाने मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे संवेदनापूर्वक पाहण्याऐवजी बळाचा वापर करण्याची प्रशासनाला आवश्यकता का पडली, याप्रकरणी सकृतदश्रनी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अँड. गिरीष नाईक थिगळे यांनी बाजू मांडली.