लासूर स्टेशन - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली गंगापूर-खुलताबाद विधानसभेची निवडणूक लढवणार्या दिग्गज उमेदवारांनी आतापासूनच मतदारसंघात फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गावात अंत्यविधी, दहावा, तेरावा, मुंजी, वाढदिवस, लग्न समारंभ, सप्ताह, कीर्तने अशा सुख-दु:खात जनतेशी भेटीगाठीच्या माध्यमातून इच्छुकांनी जनसंपर्कावर जोर दिल्याचे स्पष्ट चित्र दोन्ही तालुक्यात दिसून येत आहे.
गतवेळी ‘चला, लढू या, बदल घडवूया’ असा नारा देत प्रथमच विधानसभेवर अपक्ष म्हणून जाण्याचा मान आमदार प्रशांत बंब यांना मिळाला होता. तेव्हापासून आपणसुद्धा आमदार होऊ शकतो, या ध्येयाने गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागलेल्या इच्छुकांची संख्या डझनभरावर गेल्याने नुकतीच येणारी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार हे नक्की.
राष्ट्रवादी, शिवसेनेचा उमेदवार कोण?
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुंडलिक माने, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांनी तिसर्या व चौथ्या क्रमांकाची मते मिळवली होती. येणारी निवडणूक ही राष्ट्रवादी-कॉँग्रेस व शिवसेना तसेच विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यात होणार आहे. परंतु राष्ट्रवादी व शिवसेनेकडून कोणता उमेदवार राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2009च्या विधानसभेत उमेदवारांना पडलेली मते
अण्णासाहेब माने (शिवसेना) - 29465
कृष्णा पाटील (राष्ट्रवादी बंडखोर) - 25547
आमदार प्रशांत बंब (अपक्ष) - 53046
कुंडलिकराव माने (राष्ट्रवादी) चौथ्या क्रमांकावर होते.
फोटो - प्रतिकात्मक