आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् कारकुनाचा झाला वकील, आई-भावंडांना सांभाळून मिळवले यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वडिलांच्या रूपाने असलेला आधारवड कोसळला. दोन बहिणींचे लग्न, छोटा भाऊ व आईचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर पडली. आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी वसंतने वकिलाच्या कार्यालयात कारकून म्हणून नोकरी पकडली. नोकरी करतानाच वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आज वसंतचा अॅड. वसंत शेळके झाला.
जालना जिल्ह्यातील वसंत शेळके (रा. गोकुळ, ता. भोकरदन) सिल्लोड येथील यशवंत महाविद्यालयात बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असतानाच वडिलांचे निधन झाले. वडील अचानक गेल्यानंतर मोठी जबाबदारी वसंतच्या खांद्यावर पडली. कुशावर्ता व गया या दोन बहिणींचे लग्न, लहान भाऊ विलास व आईचा सांभाळ कसा करावा हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. भोकरदन येथील वकील वसंतराव देशमुख यांनी वसंतची परिस्थिती आेळखून त्यास आैरंगाबादला आणले. हायकोर्टातील ज्येष्ठ वकील आर. एन. धोर्डे यांच्याकडे कारकून म्हणून काम मिळवून दिले. १९९५ ते २०१० पर्यंत काम करीत असतानाच वसंतने माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. वकिलांकडे खूप काम असल्याने वसंतला विधी विभागाची परीक्षा देता येत नव्हती. रविवारी एखादा पेपर असला की वसंत परीक्षा द्यायचा व त्या विषयात उत्तीर्ण व्हायचा. असे करीत त्याने अकरा वर्षात कामातून सवड मिळवत पदवी मिळवली.

देशमुख, धोर्डे यांच्यामुळे घडलो
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडे २०१० मध्ये नोंदणी करण्यात आली. २०१४ पासून त्याने वकिली व्यवसायास प्रारंभ केला. आपल्या जीवनात अॅड. वसंतराव देशमुख व अॅड. आर. एन. धोर्डे यांचे मोठे योगदान असल्याचे तो सांगतो. अॅड. धोर्डे यांच्यामुळे आपणास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान मिळाले. अनेक प्रकरणे, पक्षकार कार्यालयात येत असल्याने खूप काही शिकण्यास मिळाले. दोन बहिणी व भावाचे लग्न करू शकलो व स्वत:च्या मुला-मुलीस चांगले शिक्षण देता आले, असेही वसंतने नमूद केले.