आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक गृहिणी म्हणजे कुशल कर्मचारी असते!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भलेही तिच्या कष्टाचे मोल कधी कुटुंबामध्ये आर्थिक रूपात केले जात नसेल. मात्र, ती कुटुंबासाठी करत असलेले काम म्हणजे ती कुशल कर्मचारी असल्याचाच पुरावा आहे, असे स्पष्ट करत अपघातात मरण पावलेल्या एका महिलेच्या कुटुंबाला लाख ६६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१५ मध्ये दिलेल्या एका निवाड्याचा हवाला देत हे आदेश देण्यात आले. उपरोक्त हवाला नसता तर त्या महिलेच्या कुटुंबाला सात लाख रुपयेच मिळाले असते.

लोणी (जि. अहमदनगर) येथील रहिवासी सुनीता राजेंद्र गोसावी (३०) यांचे माहेर सातारा-देवळाईपासून नजिक असलेले गाडीवाट. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्या पती आणि एका नातेवाइकासोबत दुचाकीवर औरंगाबादला आले. २३ ऑक्टोबर २०१३ रोजी अंत्यसंस्कार झाल्यावर त्या घरी परतत होत्या. दुपारी वाजून ४० मिनिटांनी छावणी येथील उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या बसने (एमएच २० - बीएल ७६१) दुचाकीला मागून धडक दिली. त्यात सुनीतांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती नातेवाईक गंभीर जखमी झाले. छावणी ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांच्या कुटुंबीयांनी अॅड. दिनेश काकडे यांच्यामार्फत एसटी महामंडळ, चालकाकडून नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाने राज विरुद्ध राजबीर प्रकरणात िदलेल्या निवाड्याचा अॅड. काकडे यांनी हवाला दिला. सुनीता गृहिणी असल्या तरी त्यांचे कुटुंबातील महत्त्व नाकारता येत नाही. त्या करत असलेल्या कामाचे योग्य मूल्यमापन झालेच पाहिजे. त्यांना केवळ गृहिणी समजता कुशल कर्मचारी मानले पाहिजे, अशी बाजू त्यांनी मांडली. न्यायाधिकरणाच्या सदस्य एस. एस. नायर यांनी ती मान्य केली. अर्जदाराचे वय, सुनीता यांचे उत्पन्न, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय तसेच सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे विविध निवाडे आदींचा आधार घेत त्यांनी गोसावी कुटुंबाला एसटी महामंडळ, चालकाने लाख ६६ हजार रुपये भरपाई द्यावी, असे आदेश दिले. ही रक्कम अर्ज दाखल केल्यापासून टक्के व्याजाने द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

ट्रिपल सीटचा मुद्दा निकाली
सुनीता दुचाकीवर ट्रीपल सीट जात असल्याने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद एसटी महामंडळातर्फे करण्यात आला होता. मात्र, अॅड. काकडे यांनी अहमदाबाद उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ सादर केला. ट्रिपल सीट, विनापरवाना, राँग साइड जाणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी वाहतूक पोलिस आहेत. अशांना धडक मारून मृत्यूच्या दारात लोटण्याचा अधिकार कुणालाही नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. शिवाय अपघातास सुनीतांचे पती कारणीभूत आहेत, असे म्हणणे असेल तर त्याने त्याच वेळी पोलिसांत तक्रार का केली नाही, असा सवालही केला. तो प्राधिकरणाने मान्य करत उपरोक्त निकाल दिला.