आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान महिन्यासाठी शहरात स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बैठकीत बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार. सोबत महापौर त्र्यंबक तुपे, आमदार इम्तियाज जलील, प्रमोद राठोड, प्रदीप जैस्वाल आदी.)
औरंगाबाद- रमजानचा पवित्र महिना १९ जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या भागात खाद्यपदार्थ, विविध वस्तू विक्रींचा बाजार भरतो. दरवर्षी रोशन गेट, बुढ्ढीलाइन, कटकट गेट, रोजाबाग या परिसरातील रस्त्यावर फिरते व्यापारी हातगाड्या लावतात. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. हे टाळण्यासाठी या व्यापाऱ्यांना स्वतंत्र जागा देण्यात येणार आहे. याच जागेवर विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. रमजान महिना संपेपर्यंत ठरवून दिलेल्या जागेवरच हातगाड्या लावण्यात येतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरात हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे.
बैठकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, आमदार इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, विरोधी पक्षनेते जहांगीर खान, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह हॉकर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. रमजान महिन्यात शहरातील विविध भागांत रस्त्यावरच हातगाड्या लावून विविध वस्तूंची विक्री होते. त्यामुळे चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी एक महिन्यासाठी स्वतंत्र बाजारपेठांची निर्मिती करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी या बाजारपेठा असतील तेथे स्वच्छता, वीज, पाणी या सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन महापौरांनी या वेळी दिले.
ठरलेल्या जागेत हातगाड्या लावणाऱ्या विक्रेत्यांना पहिले पाच दिवस सूट देण्यात येईल. त्यानंतर मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
बैठकीस पोलिस उपायुक्त संदीप आटुळे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, शहर अभियंता सखाराम पानझडे, पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, नागनाथ कोडे, माजी महापौर रशीद मामू, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय शहा, हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहसीन अहमद, नगरसेवक आयुब जहागीरदार, हाजी इसाक, नासेर सिद्दिकी, हाजी इरशाद खान, डॉ. अफझल खान, शारेक नक्षबंदी, शाकीब खुसरो, गंगाधर ढगे, फिरोज खान, उमर खान, जफर बिल्डर, अब्दुल मतीन, एम. गफ्फर, विठ्ठल कदम आदींची उपस्थिती होती.
येथे भरेल रमजानची बाजारपेठ
१. बुढ्ढी लाइन येथील बाजार आमखास मैदानावर भरेल.
२. रोशन गेटचा बाजार बडी गिरणी मैदानावर.
३. रोजा बागचा बाजार ईदगाह मैदानावर.
४.शहागंजचा बाजार सिटी बसस्थानकाच्या जागेवर.
५.कटकट गेटचा बाजार मुजीब अलम खान यांच्या मोकळ्या प्लाॅटवर.
६.जिन्सी भागातील बाजार जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील मैदानावर.
७.युनूस कॉलनी येथील बाजार अलनिसा उर्दू शाळेच्या मैदानावर.
८.सदाफ कॉलनीमधील मोकळी जागादेखील बाजारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहाराच्या विकासासाठी मानसिकता बदला
शहराच्या विकासासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे. रस्त्यावर कोणीही हातगाड्या लावणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले जाईल. बाजारपेठेसाठी दिलेल्या स्वतंत्र जागेत सुविधा देण्यात येतील. शिवाय कोणत्याही विक्रेत्यासोबत पोलिस उद्धटपणे बोलणार नाही, अरेरावाची भाषा करणार नाही, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हॉकर्स संघटनेला दिले. या विक्रेत्यांचे पोट हातावर आहे, त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले.