आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंप्री शाळेतील शिक्षकाची दांडी; पालकांमध्ये संताप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागद -कन्नड-सोयगाव मतदारसंघातील नागदपासून सहा किलोमीटर अंतरावरील पिंप्री येथील जि. प. ची प्राथमिक शाळा 28 डिसेंबर रोजी शिक्षकांअभावी बंद होती. यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला.पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेत दोन शिक्षक आहे. वर्षभरापूर्वी 40 वर असलेली विद्यार्थी संख्या आता 13 वर आली आहे. या शाळेकडे वरिष्ठ पातळीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शाळेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. असेच वातावरण राहिल्यास शाळा लवकरच बंद होईल, अशी पालकांची ओरड आहे.


कन्नड तालुक्यातील नागदपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील पिंप्री येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची प्राथमिक शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक असून त्यातील एक शिक्षक सात महिन्यांपासून शाळेवर येत नाही, तर एकाच शिक्षकावर चार वर्गांचे ओझे आहे. 28 डिसेंबर रोजी एक शिक्षक शाळेतच न आल्यामुळे शाळा बंद राहिली. यामुळे परिसरातील पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते. शाळा वारंवार बंद राहते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांमधून होत आहे. वारंवार शाळेविषयी निवेदन देऊनही प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेतली जात नसल्याची पालकांची ओरड आहे. अनेक पालकांनी तर शाळेच्या या अनागोंदी कारभारामुळे आपली मुले दहा किलोमीटर अंतरावरील किन्ही येथील शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सुटी नसताना शाळा बंद असलेल्या शाळेवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी शालेय समितीचे अध्यक्ष देविदास दौड, प्रवीण दौड, शुभम पवार आदींनी केली आहे.

शाळा बंद असल्याचे मला माहीत नाही. मी प्रशिक्षणाला आहे.- जे. व्ही. चौरे, विस्तार अधिकारी
शाळा बंद असल्याचे मला ग्रामस्थांचे फोन आल्यावर कळाले. शिक्षकाचे एक दिवसाचे वेतन कपात करणार आहे.- एस. व्ही. वाघ, केंद्रप्रमुख

वरिष्ठांकडे वारंवार शाळेविषयी तक्रारी दिल्या, परंतु वरिष्ठांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. सर्व कारभार आलबेल आहे.- देविदास दौड, ग्रामस्थ

शनिवारी मी शाळेत आलो होतो, परंतु प्रकृती ठीक नसल्याने परत गेलो. ए. एम. देवरे, शिक्षक