आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडली तरीही पीएफ खाते सुरू ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खासगी क्षेत्रातील कर्मचारी किंवा कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या भविष्य निर्वाह (पीएफ) निधीची रक्कमच त्यांना ‘पेन्शन’ म्हणून उपयोगात येते. त्यामुळे काम सोडले तरीही कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते सुरूच ठेवण्याची तरतूद केली जावी. तथापि, या काळात स्वेच्छेने रक्कम जमा करण्याची सोयही करण्यात यावी, अशी मागणी कामगार कायद्याचे जाणकार जयेश तुषार मोरे यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

शासकीय सेवेत काम करणार्‍यांना सेवानिवृत्तिवेतन मिळते. मात्र, खासगी क्षेत्रात काम करणार्‍या श्रमिक, कष्टकर्‍यांना निवृत्तिवेतन देण्याची मागणी असली तरी अद्याप मंजूर झालेली नाही. त्यामुळे कामगार, र्शमिक, कष्टकरी आणि मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते निरंतर सुरू ठेवण्याचा पर्याय मोरे यांनी मांडला आहे.

आधार कार्डच्या मदतीने श्रमिकांना युनिक पी. एफ. नंबर देऊन नोकरी सोडली तरीही त्यांना खात्यात पैसे जमा करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी ‘प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स अँक्ट-1952’ या कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असल्यास केंद्र सरकारने नक्की करावी, अशी मागणी करणारे निवेदनच त्यांनी केंद्रीय कायदा मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांनाही पाठवले आहे. एक नोकरी सोडून दुसरी कंपनीची नोकरी पत्करली तर भविष्य निर्वाह निधीची रक्कम उचलणे किंवा ती स्थलांतरित करणे असे दोनच पर्याय श्रमिकांकडे असतात.

रक्कम उचलण्याच्या पर्यायाऐवजी स्थलांतरणाची अंमलबजावणी काटेकोर आणि प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय निवृत्तीच्या उंबरठय़ावर कष्टकर्‍यांकडे काहीच रक्कम शिल्लक राहणार नसल्याची भीती यामुळे निर्माण होईल. म्हणून कष्टकरी, कामगार आणि श्रमिकवर्गाचे खाते निरंतर सुरू ठेवण्याची सूचना मोरे यांनी मांडली आहे.