आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सुरक्षेची रंगीत तालीम झाली यशस्वी, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दहा दिवसांवर स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे. परभणीतून इसिसच्या संपर्कात असलेले दोन तरुण औरंगाबाद एटीएसच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून आयईडी बॉम्ब जप्त केल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे मराठवाड्यात दहशतीचे वातावरण आहे.
मात्र, दुर्दैवाने अशा परिस्थिती ओढवल्यास यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहण्याकरिता शनिवारी पोलिस विभागाकडून मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे तीन अतिरेकी घुसले असून त्यांनी पर्यटकांना बंदी बनवल्याचा बनाव करण्यात आला. फोर्स वन क्यूआरटी पथक आणि पोलिस दलाने तातडीची कारवाई करत मिशन रामा यशस्वी केले.

सकाळी साडेअकराच्या सुमारास हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे तीन अतिरेकी घुसले, अशी माहिती पोलिस विभागाला मिळाली. त्यांनी सीसीटीव्ही रूम ताब्यात घेतली असून काही पर्यटकांना बंदी केले आहे, असा बनाव रचण्यात आला होता. खरेखुरे अतिरेकी हॉटेलमध्ये असावेत अशा प्रकारे क्यूआरटी पथक आणि फोर्स वनचे जवान कारवाई करत होते. काही मिनिटांच्या आत संपूर्ण हॉटेलला वेढा घालण्यात आला. हॉटेलच्या मागच्या बाजूने जवानांनी आत प्रवेश केला. सीसीटीव्ही रूममधील अतिरेक्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पर्यटकांना बंदी केलेल्या दोन अतिरेक्यांना ताब्यात घेऊन पर्यटकांची सुटका केली. ज्या हद्दीत मॉक ड्रिल झाली त्या हद्दीतील पोलिस ठाण्याची तत्परतादेखील या वेळी तपासण्यात आली. सिडको आणि मुकुंदवाडी या पोलिस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, संदीप आटोळे, सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन पार पडले.
यंत्रणेची तपासणी
सुरक्षायंत्रणेचीतपासणी करण्यासाठी अशा प्रकारे मॉक ड्रिल करण्यात येते. कुठल्या ठिकाणी काय चुकले हे लक्षात घेऊन त्यानुसार सुधारणा करण्यात येते. -राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ

शहरात अफवांचे पीक
वर्तमानपत्रातरोज एटीएस आणि त्यांच्या कारवायांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे रोज नव्या अफवांना पेव फुटते. हॉटेल रामाच्या पुढे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा पाहिल्यानंतर अनेक अफवा सुरू झाल्या. शहरात अतिरेकी घुसल्याची चर्चा रात्रीपर्यंत शहरात सुरू होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो..
बातम्या आणखी आहेत...