आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Next Year Panchakki Water May Available For Driking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणचक्कीचे पाणी पुढील वर्षी मिळेल पिण्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगप्रसिद्ध पाणचक्कीतून खाम नदीच्या पात्रात वाहून जाणारे पाणी पुढील वर्षी म्हणजे २०१६ च्या अखेरीस औरंगाबादेतील लोकांना पिण्यासाठी मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने वक्फ बोर्डाच्या मदतीने ही योजना तयार केली आहे. त्याकरिता तीन कोटी २ लाख रुपयांचा निधीही केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

हर्सूल सावंगी आणि परिसरातील डोंगरातून येणारे पावसाचे तसेच झिरपत येणारे पाणी नहरींच्या माध्यमातून पाणचक्कीत आणले जाते. १७ व्या शतकात या अद्भुत यंत्रणेची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून पाणचक्की जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे सुमारे वीस फूट उंचावरून पडणारे पाणी हौदात गोळा होते आणि तेथून लगतच्या खाम नदी पात्रात सोडले जाते. त्याचा लोकांच्या दैनंदिन जीवनात कोणताही उपयोग आतापर्यंत झाला नाही.
कारण तसा कोणी विचारही केला नव्हता.

आराखड्यासह निधी मंजूर, ५० हजार लिटर क्षमतेचे दोन हौद बांधणार
महामंडळाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी अतिशय चिकाटीने मूळ उगम स्रोतापासून ते अंतिम टप्प्यापर्यंत पाण्याचे नेमके काय होते, याचा अभ्यास केला. त्यात ते पिण्यायोग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच त्यांनी पाणचक्कीलगतच दोन मोठे हौद बांधून हे पाणी लोकांना पिण्यासाठी कसे देता येईल, याचा आराखडा तयार केला. त्यास महामंडळ, वक्फ बोर्डाने मान्यता दिली. सोबत हौद बांधणीसाठी निधीही दिला. या संदर्भात देशपांडे म्हणाले की, पाणचक्कीच्या आतील बाजूस असलेली साहित्य विक्रीची दुकाने स्थलांतरित करून तेथे ५० हजार लिटर क्षमतेचे दोन हौद बांधले जाणार आहेत. पाइपलाइनद्वारे या हौदातील पाणी मनपाच्या टँकरमध्ये भरले जाईल. तेथून ते कोणत्या वसाहतीत पाठवायचे याचा अधिकार महापालिकेलाच आहे.
डॉ. शेख यांचा पाठपुरावा : इतिहासाचे अभ्यासक डॉ. रमजान शेख यांनी आठ वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन, मनपाचे त्याकडे लक्ष वेधले. शहरातील टंचाई लक्षात घेता नदी पात्रात पाणी सोडून देण्यापेक्षा ते लोकांना पुरवावे. पाणचक्कीचा परिसर उंचावर असल्याने नैसर्गिक उतारावर असलेल्या रेल्वे स्टेशनजवळच्या सादातनगरपर्यंत कॅनॉलद्वारे सहज जाऊ शकते. त्यासाठी फार खर्च करण्याची गरज नाही. शिवाय कोहिनूर कॉलनी, पोलिस कॉलनीतील घरांनाही हे पाणी मिळू शकते, असे त्यांनी मांडले. पाठपुरावाही केला. मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पर्यटन महामंडळाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला.