आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतिमंदांच्या पंखांना मिळाले बळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- ‘मतिमंद’ म्हणजेच बौद्धिकदृष्ट्या अपंग जन्माला आलेल्या मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच मुळात नकारात्मक दिसतो. अशा मुलांच्या ‘आज’च्या पेक्षा ‘उद्या’चीच चिंता असते. त्यातच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घरात असे मूल असेल तर आणखी बिकट स्थिती उद्भवते. अशा मुलांना शाळेतही ठेवले जात नाही. या अपंग मुलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचे काम मुलांच्या 11 मातांनी एकत्र येऊन सुरू केले. 16 जानेवारी 2001 रोजी वाळूज परिसरात स्वयंसिद्ध मातृपालक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.

वाळूज महानगरातील बजाज गेट ते वाल्मी नाका या रस्त्यावर असलेल्या मातृपालक संस्थेची स्वयंसिद्ध विवेकसिंग विशेष शाळा आहे. बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलांच्या मातांनी एकत्र येऊन या शाळेची उभारणी 2001 मध्ये केली. त्यात अर्चना जोशी, वर्षा भाले, अंजली मेढेकर, अंजली गलांडे, स्मिता माणकेश्वर, स्मिता कुलकर्णी, तारा तोलवाणी, ज्योती कवराणी, विद्या सांगवीकर, संगीता देशपांडे व स्मिता झरकर यांचा सिंहाचा वाटा आहे.

मातांनी घेतले प्रशिक्षण
विशेष बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नागपूर व हैदराबाद येथे वर्षा भाले, वृषाली देशपांडे, माधुरी देशपांडे, संपदा पाटोळे या मातांनी विशेष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2003 मध्ये संस्थेला शाळेचे स्वरूप दिले. शाळेसाठी सोमनाथ साखरे यांनी वाळूज परिसरात पाऊण एकर जागा दान दिली. या जागेवर तत्कालीन पोलिस उपायुक्त हरीश बैजल, अनिल इरावणे यांच्या विशेष सहकार्यातून शाळेची सुसज्ज इमारत 2007 मध्ये उभारण्यात आली.

बिग बींच्या हस्ते उद्घाटन
शाळेच्या इमारतीचे उद्घाटन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2007 रोजी बालदिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. या वेळी सुप्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.

शाळेचे पदाधिकारी
अध्यक्षा स्मिता माणकेश्वर, उपाध्यक्षा नीता कुलकर्णी, सचिव अंजू तायल, सहसचिव अंजली मेढेकर, विद्या सांगवीकर, स्मिता झरकर, डॉ. महेश जोशी, डॉ. वंदना मेहता, सुनीता साखरे, सुनील शिंदे, राजेंद्र खत्री.

शाळेला विवेकसिंग यांचे नाव
शाळेच्या उभारणीसाठी सुप्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग व चित्रासिंग यांची भरीव आर्थिक मदत मिळाली. या दांपत्याचा एकुलता एक मुलगा विवेकसिंग यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ या शाळेला ‘विवेकसिंग विशेष शाळा’ असे नाव देण्यात आले.

पणत्यासह विविध वस्तूंची विक्री
मुलांनी साकारलेल्या शोभिवंत वस्तूंना ग्राहक मिळावा यासाठी त्या प्रोझोन मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. दिवाळीच्या निमित्त तयार केलेल्या पणत्या मुंबईमध्येही स्टॉल लावून विक्री करण्यात येत आहेत. त्यामुळे या मुलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे.