आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनआयसीयूं’चा दर्जा आऊट ऑफ कंट्रोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रुग्णालयांमधील ‘एनआयसीयू’च्या (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) गुणात्मक दर्जावर शासकीय किंवा इतर कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील एनआयसीयूंची कुठलीही नियमित तपासणी होत नाही. त्यामुळेच दर्जानुसार अँक्रिडेशनसाठी शासकीय किंवा खासगी रुग्णालये उदासीन असल्याचे चित्र आहे. मात्र, दुर्घटना टाळण्यासाठी निकषांवर नियंत्रण ठेवणारी सक्षम यंत्रणा आवश्यक असल्याचा सूर तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

राजस्थानातील एका शासकीय रुग्णालयात तांत्रिक बिघाडामुळे चार नवजात बालके गंभीररीत्या भाजली गेल्याची घटना रविवारी (13 जानेवारी) घडली. बालरुग्णांसाठी चुकीच्या पद्धतीने ‘वॉर्मर’ हे उपकरण वापरल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात, असेही म्हटले जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णालये एनआयसीयूमध्ये दुर्घटना टाळण्यासाठी किती सज्ज आहेत ही बाब ‘दिव्य मराठी’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने वेगवेगळी तथ्ये समोर आली. एनआयसीयूसाठी वेगवेगळे निकष असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून आले.

‘नॅशनल नियोनॅटॉलॉजी फोरम’ (एनएनएफ) या राष्ट्रीय पातळीवरील बालरोगतज्ज्ञांच्या मंडळाने विशिष्ट निकष मांडले आहेत. वेगवेगळ्या अद्ययावत सुविधा, तातडीच्या उपचाराच्या सेवा, रुग्णसंख्येच्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ परिचारिका व इतर कर्मचार्‍यांची संख्या आदींच्या निकषांनुसार ‘एनएनएफ’ने एनआयसीयूची लेव्हल ‘वन’, ‘टू’ व ‘थ्री’ अशी वर्गवारी केली आहे. रुग्णालयातील उपलब्ध सुविधांनुसार त्या त्या लेव्हलचे मानांकन घेणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णालये या प्रकारचे मानांकन घेण्याबाबत उदासीन आहेत. अशा प्रकारचे मानांकन रुग्णालयातील फलकावर जाहीर करणे अपेक्षित आहे. बोटावर मोजता येतील अशा रुग्णालयांनी अशा प्रकारचे अँक्रिडेशन घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे एनआयसीयू त्या त्या लेव्हलचे आहेत किंवा नाहीत याची शासकीय पातळीवर ना नियमित तपासणी होते ना त्यावर कुठले नियंत्रण आहे. शहरातील किती एनआयसीयू ‘एनएनएफ’नुसार अद्ययावत आहेत याची सरकार दरबारी नोंदही नाही.

एनआयसीयूची अजूनही प्रतीक्षा
2009 मध्ये उद्घाटन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे एनआयसीयू अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरसह अनेक आधुनिक उपकरणे तीन वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्ण मोठय़ा प्रमाणावर येतात. मात्र, हा स्वतंत्र विभाग सुरू न झाल्याने गैरसोय होत आहे.

शासकीय यंत्रणेकडून नियमित तपासणी नाही
80 टक्के एनआयसीयूंकडे दर्जानुसार मानांकन नाही
निकषांची अंमलबजावणी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक

रुग्णालयांनी अँक्रिडेशन घ्यावे
तातडीच्या वैद्यकीय सुविधांसाठी सुसज्ज एनआयसीयू असणे आवश्यक आहे. निकषांनुसार सोयी-सुविधा असणे रुग्णाच्या हिताच्या आहेत. सुविधांनुसार अँक्रिडेशन घेणेही गरजेचे आहे. त्यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.
-डॉ. उदय फुटे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.

नर्सिंग होमचेच रजिस्ट्रेशन
शासकीय पातळीवर एनआयसीयू अशी वेगळी नोंद होत नाही, तर नर्सिंग होम असेच रजिस्ट्रेशन होते. मात्र, तक्रार आली तर एनआयसीयूची तपासणी होते. तक्रारीशिवायही तपासणी होऊ शकते. आता या प्रकारची तपासणी सुरू केली आहे.
-डॉ. जयश्री कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, महापालिका.

धोका मानवी चुकांमुळेच अधिक
एनआयसीयूमध्ये वापरले जाणारे वॉर्मर हेदेखील सुरक्षित उपकरण आहे. शरीराचे तापमान 37 डिग्री सेंटिग्रेड राखण्यासाठी रुग्णाच्या त्वचेला ‘वॉर्मर’चा प्रोब लावला जातो आणि त्यानुसार उपकरणाचे तापमान कमी-जास्त होते. मात्र, प्रोब निसटून दुसरीकडे पडला तर त्यानुसार तापमान वाढू किंवा कमी होऊ शकते व दुर्घटना घडू शकते. त्यासाठीच कायम सतर्क राहणे आवश्यक आहे.
-डॉ. राजेंद्र खडके, माजी शहराध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना