आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निराला बाजार ते नागेश्वरवाडी; ठिगळांतच संपले रस्त्याचे आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आठ वर्षांपूर्वी नव्याने तयार केलेल्या निराला बाजार ते नागेश्वरवाडी या रस्त्याचे आयुष्य ठिगळपट्टी आणि तीही निकृष्ट दर्जाची करण्यातच संपल्याने खड्डे आणि टेकाडांचे अवशेष जागोजाग दिसत आहेत. निराला बाजाराचा उतार संपताच सुरू होणार्‍या खड्डय़ांतून कसरत करीत जाणार्‍या नागरिकांचे दररोज हाल होत आहेत.

जुन्या शहरात, घाटी, पोलिस आयुक्तालय, विद्यापीठ या भागात जाण्यासाठी सोयीचा असणारा हा रस्ता आहे. 1988 पर्यंत हा रस्ता अस्तित्वात नव्हता. मनपा अस्तित्वात आली आणि नाल्यावर पूल होऊन नागेश्वरवाडी आणि निराला बाजार हे दोन भाग जोडले गेले. रुंदीकरण वगैरे करून 1995 ते 2000 या काळात हा रस्ता चांगला रुंद झाला. तोपर्यंत निरालाबाजार परिसरही चांगलाच विकसित झाला होता. त्यामुळे अल्पावधीत हा रस्ता वर्दळीचा बनला. आज या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते.

मुख्य अडचण पाण्याची

या रस्त्याच्या दोन्ही टोकांकडून उतार आहे, शिवाय नागेश्वरवाडी शाळेकडून येणारा उतारही या रस्त्याला मिळतो. परिणामी या खोलगट भागात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे. पुढे नाल्याच्या दिशेने पाणी जाण्यात अडचण येत असल्याने तो भाग अधिक खड्डय़ांचा आहे.

वाढत जाणार्‍या खड्डय़ांनी स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संशोधन संस्थेपासून नागेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता व्यापला आहे. हे खड्डे अधिक धोकादायक बनत चालले आहेत. मागील काही वर्षांत बेछूट आणि अशास्त्रीय पद्धतीने पॅचवर्क केल्याने या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

कुणाचेच लक्ष नाही

हा रस्ता ज्यांच्या काळात झाला, त्या शिवसेनेच्या माजी उपमहापौर लता दलाल म्हणाल्या की, माझ्या काळात या रस्त्याचे बरेच काम झाले. रस्ता चांगला असावा याकडे लक्ष दिल्याने बराच काळ तो चांगला राहिला. आता तशी अवस्था राहिलेली नाही. या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

दोन वॉर्डांत रस्ता

350 मीटरचा हा रस्ता दोन वॉर्डांत मोडतो. औरंगपुरा वॉर्डाचे अनिल मकरिये आणि नागेश्वरवाडी वॉर्डाच्या कीर्ती शिंदे या वॉर्डाच्या नगरसेवक आहेत. त्यापैकी अनिल मकरिये या रस्त्याच्या प्रश्नावर बोलले. ते म्हणाले, दोन वॉर्डांत हा रस्ता येतो, तरी मी माझ्या परीने या रस्त्यासाठी प्रयत्न करीत आहे. औरंगपुरा वॉर्डात इतर रस्ते केले, हा मागे पडला.

कंत्राटदार आठवत नाही
रस्ता तयार केल्यानंतर वर्षभरानंतर त्याची दुरुस्ती व सील कोट म्हणजे डांबराचा थर द्यावा लागतो. त्यामुळे रस्त्याचे आयुष्य वाढते. गेल्या तीन वर्षांत फक्त पॅचवर्कचे काम करण्यात आले. त्या वेळी काम केलेल्या कंत्राटदाराचे नाव आठवत नाही. लता दलाल, माजी उपमहापौर

पावसामुळे काम रखडले
हा रस्ता आताच तयार होणार होता, पण पाऊस जास्त असल्याने हे काम करता आलेले नाही. आठवडाभरासाठी जरी पाऊस उघडला, तरी हे काम करता येऊ शकते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनिल मकरिये, नगरसेवक