आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यांनी नवकविता लिहिली अन् मी हात जोडले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वैद्यांच्या हाताखाली पत्रकारितेतील माझी उमेदवारी सुरू झाली. पैकी एक मोठे व दुसरे धाकटे बंधू. गोपाळ साक्रीकर कार्यकारी संपादक होते. ते सारखे म्हणायचे, ‘धाकट्याकडे फीचरला पाठवा अन् मोठय़ाकडे मस्ट म्हणून लिहून ठेवा.’ दोन वैद्यांना साक्रीकरांनी अशी भावंडासारखी मोठा व धाकटा अशी नावेच पाडली. दोघेही अरविंद. त्यामुळे असे त्यांनी केल्याचे स्पष्टीकरण द्यायचे. पुढे मग सोयीने अआ वैद्य (अरविंद आत्माराम) व अगं (अरविंद गंगाधर) असे संपादकीय विभाग सोडून अन्य म्हणत. छोटे वैद्य पान खायचे म्हणून ते वैद्य पानगावकर झाले. अन् मोठे वैद्य सिगारेट ओढायचे (बर्कले) म्हणून वैद्य बर्कलेवाले झाले. प्रमोद माने व हेमंत मिरखेलकर अआ वैद्यांना टेटे वैद्य म्हणायचे, पण अआ वैद्यांचे खरे नामकरण केले ते व्यंकटेश केसरीने-ब्रिगेडियर वैद्य, कारण वैद्यांचा मिलिटरी खाक्या. त्यांचा स्वभाव तोलून मापून, संयमित हसणे, संयमित मजा, संयमित चर्चा. कामसुद्धा तोलून मापून; पण शिस्तीत सारे काही डेडलाइनच्या अधीन राहून वेळेवर काम संपवून वेळेवर जाणे. एका मजकुराच्या कॉपीत मोजकेच शब्द लिहिणे हा त्यांचा आणखी एक गुण असे. त्यांचे अक्षर भसाडे होते; पण स्पष्टपणे दिसायचे. त्या वेळी हँडकंपोजिंग होते. खेचकाम म्हणायचे कंपोझिटर्सच्या कामाला. शेंडे-उदावंत व मुरलीधर आमटे हे फोरमन. वैद्य आल्या आल्या पीटीआयचे धडाडणारे यंत्र बघायचे, ते सुरू करायचे.

संपादकीय विभागाच्या कामात शिस्त असावी. उगाच टवाळ्या नको, असा आव ते नेहमी आणायचे महावीर जोंधळे, जयदेव डोळे, राधाकृष्ण मुळी, सुंदर लटपटे (हासुद्धा वैद्यांसारखाच झोकात सिगारेट ओढायचा.) अनिल डोंगरे, निळू दामले, सुभाष वाघोलीकर, भालचंद्र देशपांडे आणि खुद्द साक्रीकरांना हे मंजूर नसायचे. वैद्य गप्पाष्टकात कधी रंगले नाहीत; पण ते आडकाठी आणायचे नाहीत. कोणतीच फुशारकी, बडेजाव त्यांनी मिरवला नाही; पण तरीही ते आग्रही राहिले मुद्दय़ाशी. संपादकीय विभागात असलेल्या अनेक समाजवाद्यांपेक्षा त्यांची भूमिका वेगळीच असे.