आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्डा, काळे यांच्या नकारामुळे अखेर नितीन पाटील मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार डॉ. कल्याण काळे यांनी नकाराचा कडवा सूर आळवल्याने औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीची माळ काँग्रेसने अखेर नितीन पाटील यांच्या गळ्यात टाकली. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी त्यांची थेट लढत होईल. दरम्यान, दोन वर्षांपासून तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या उत्तमसिंह पवार यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

जालना मतदारसंघातून काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांचे चिरंजीव विलास यांना उमेदवारी दिली तेव्हाच औरंगाबादेतून मराठा समाजाचाच उमेदवार असेल हे जवळपास नक्की झाले होते. तरीही तगड्या उमेदवाराच्या यादीतील दर्डांची मनधरणी करण्यात आली. परंतु, रामकृष्णबाबा पाटलांसह मराठा समाजाचे अनेक नेते गेल्या लोकसभेतील पराभवाचा हिशेब चुकता करण्याची शक्यता, खैरेंशी खास मैत्री यामुळे दर्डांनी साफ नकार दिला.

खैरेंसोबतच्या मैत्री उघड करण्याचा प्रयत्न ओळखला
खैरैंना पराभूत करण्यासाठी या वेळी तगडाच उमेदवार हवा, असे र्शेष्ठींनी ठरवले होते. तीन वेळा आमदार तथा मंत्री झालेले दर्डा लढले, तर खैरे पराभूत होतील, अशी चर्चा काही काँग्रेसजनांनीच सुरू करून दिली. खैरे-दर्डांमधील मैत्री या निमित्ताने उघड व्हावी, असाही त्यांचा उद्देश होता. मात्र, पक्षांतर्गत विरोधकांचा प्रयत्न दर्डांनी ओळखला. आधी अटी घातल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

..म्हणून काळेंची माघार
गेल्यावेळी जालन्यातून पराभूत झालेले फुलंब्रीचे विद्यमान आमदार व मराठा समाजात महत्वपूर्ण मानले गेलेले डॉ. कल्याण काळे यांच्याकडे र्शेष्ठींनी त्यानंतर मोर्चा वळवला. मात्र, वैजापूर, गंगापूरचे मातब्बर मराठे आपल्याला स्वीकारणार नाहीत, असे त्यांच्या लक्षात आले. एकापाठोपाठ दोन निवडणूक (2009 आधी जालना लोकसभा अन नंतर फुलंब्री विधानसभा) लढवताना सर्व पद्धतीने काय दमछाक होते, हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी र्शेष्ठींना स्पष्ट नकार कळवला. यंदा पुन्हा मराठा कार्डच वापरायचे असे काँग्रेसने ठरवल्याने कन्नडचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा तीन वेळा लोकसभेचे उमेदवार राहिलेले सुरेश पाटील यांचे चिरंजीव या नात्याने नितीन पाटील काँग्रेसचे उमेदवार ठरले. या वेळी बहुसंख्य मराठा मतदार असलेल्या समाजातील उमेदवारच खैरेंना पराभूत करू शकेल ही र्शेष्टींची अटकळ पाटील यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच त्यांच्याकडे उमेदवारी चालून आली असल्याचे दिसते.

यापूर्वी काय झाले
1999 पासून औरंगाबाद लोकसभा शिवसेनेच्या म्हणजेच चंद्रकांत खैरे यांच्या ताब्यात आहे. तेव्हापासून येथील लढत खैरेंसाठी कधीच सहजसोपी झाली नाही. 1999 मध्ये माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले त्यांच्यासमोर होते. त्यानंतर 2004 मध्ये आयुष्यात कायम अपराजित राहिलेले माजी आमदार तथा खासदार रामकृष्णबाबा पाटील रिंगणात आले. परंतु खैरेंची सरशी झाली. त्यानंतर 2009मध्ये उत्तमसिंग पवार यांना संधी मिळाली. वेरुळ मठाचे शांतिगिरी महाराज मैदानात असल्यामुळे खैरेंची खैर नाही, असे तेव्हा म्हटले जात होते. परंतु शांतिगिरींनी दीड लाखावर मते घेतल्यानंतरही खैरे राजकारणातून शांत झाले नाही. उलट महाराजांच्या उमेदवारीचा काँग्रेसलाच फटका बसला.

एवढा उशिर कशासाठी
निवडणूक लढविणार नाही, असे दर्डांनी फेब्रुवारीच्या अखेरीसच र्शेष्ठींना कळवले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात डॉ. काळे यांनीही नकार कळवला होता. तेव्हाच पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही त्यांच्या नावाची घोषणा करण्यास एवढा उशिर कशासाठी, असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळातही उपस्थित होत आहे.

नांदेडचा उमेदवार ठरेना : मराठवाड्यात आता नांदेडचाच काँग्रेस उमेदवार अजूनही ठरलेला नाही. 17 एप्रिलला येथे मतदान असून, उमेदवारीसाठी बुधवारी शेवटची तारीख आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे स्वत:साठी किंवा पत्नी अमिता यांना तिकीट मिळावे यासाठी आग्रही आहेत.

नितीन पाटील यांचा ताळेबंद
कमकुवत बाजू
1. वक्तृत्व नाही. कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. पारंपरिक मतांवरच अवलंबून.
2. जिल्हा बँक घोटाळ्यात घोटाळा वडिलांनी केला व मुलाची सही होती म्हणून नाव आल्याचा युक्तिवाद होत असला तरी पोलिस दप्तरी आरोपी म्हणून नोंद.
3. स्वबळावर मतदार खेचण्याची ताकद नाही.

बलस्थाने
1. परंपरागत मराठा राजकारणी कुटुंब
2. वडील जिल्हा बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे जिल्हय़ातील काही तालुक्यांत नेटवर्क.
3. माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील स्वत:च्या मुलाच्या साडूला पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत, असे बोलले जाते.
4. नितीन कन्नडचे आमदार होते. पराभूत झाल्यास ते तेथून पुन्हा विधानसभा लढवू शकतात. ही शक्यता पाहून आपला अडसर दूर व्हावा म्हणून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या नामदेव पवारांपासून विधानसभेचे इच्छुक त्यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न करतील, अशी अटकळ आहे. कन्नडच्या मताधिक्यावरच खैरे विजयी झाले होते.