आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Patil News In Marathi, Congress, Aurangabad Lok Sabha Constituncy

कॉंग्रेस उमेदवार नितीन पाटलांची दीड कोटीची संपत्ती नऊ कोटींवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस उमेदवार माजी आमदार नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात 9 कोटी 23 लाख 70 हजार 930 रुपयांची संपत्ती जाहीर केली. 2004 मध्ये कन्नड विधानसभा निवडणूक लढवताना मात्र त्यांनी फक्त 1 कोटी 70 लाख 2 हजार 212 चल-अचल संपत्ती असल्याचे म्हटले होते. दोन्ही प्रतिज्ञापत्रांनुसार 7 कोटी 53 लाख 68 हजार 718 रुपयांची संपत्ती वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोळसा, आदर्श घोटाळा, राष्ट्रकुल आणि टूजी स्पेक्ट्रमसारख्या घोटाळ्यांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए-1 आणि यूपीए-2 या दोन्ही सरकारांची विरोधकांनी प्रचंड मानहानी केली. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेस सरकारला भाजपने खिंडीत गाठून अनेक वेळा संसदेचे कामही बंद पाडले, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने काँग्रेसला भाजपच्या तुलनेत अधिक जेरीस आणले. त्यामुळे काँग्रेसने पुण्यातून सुरेश कलमाडी यांना उमेदवारी नाकारून आपणही भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालत नसल्याचा कांगावा केला. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या नितीन पाटील यांची प्रतिमा कलमाडींपेक्षा वेगळी नाही. 2004 मध्ये पहिल्यांदा कन्नड येथून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी निव्वळ बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेल्या त्या वेळच्या 34 वर्षीय पाटील यांच्याकडे 1 कोटी 70 लाख 2 हजार 212 रुपयांची संपत्ती होती. मागील दहा वर्षांमध्ये 44 वर्षीय पाटील यांनी आताच्या प्रतिज्ञापत्रानुसार 9 कोटी 23 लाख 70 हजार 930 रुपयांची संपत्ती नमूद केली आहे.


मुंबई, पुण्यात घरे आणि संपत्ती
2004 मध्ये दीड कोटीची अचल संपत्ती त्यांनी दाखवली. त्यामध्ये औरंगाबादेत 4 लाख 30 हजार 428 रुपयांचे घर, पुण्यात 1 लाख 94 हजार 245 रुपयांचे, तर मुंबईमध्ये 52 लाखांचे घर असल्याचे त्यांनी नमूद केले होते. आता मात्र दीड कोटींची अचल संपत्ती 5 कोटी 54 लाख 48 हजार 224 रुपयांची झाली आहे. त्याशिवाय पत्नीकडे 28 लाख 80 हजार 687 रुपयांची अचल संपत्ती आहे.


भरती प्रकरणात दोषमुक्त
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा देखरेख सहकारी संस्थेत भरतीप्रकरणी पैसे घेऊन नोकर्‍या देण्याचा आरोप नितीन पाटील यांच्यावर आहे. 576 जणांच्या नोकर्‍यांचे हे प्रकरण असून माजी आमदार नितीन पाटील आणि काँग्रेसचेच माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांना 20 मे 2007 रोजी अटक करण्यात आली होती. 311 लिपिक, 132 शिपाई आणि 133 ब्लॉक सेक्रेटरी भरतीचे हे प्रकरण आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. आता दोषमुक्त झाल्याचे पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले होते.


आधी फोर व्हीलर आता दुचाकी!
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या विवरणात पाटील यांनी आपल्याकडे एक चार चाकी वाहन असल्याचे नमूद केले होते. त्या वेळी त्यांनी पाच लाख दहा हजारांचे वाहन असल्याचे जाहीर केले. आता मात्र कार नव्हे, तर फक्त एक स्प्लेंडर दुचाकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

जाहीर संपत्तीचा वाढता आलेख
विवरण 2004 2014
रोख निरंक 5 लाख 19 हजार
बचत, बॉंड 20 लाख 13 हजार 713 / 26 लाख 11 हजार 310
वाहन चारचाकी / दुचाकी
सोने निरंक / 9 लाख 10 हजार 563
* आता पत्नी आणि स्वत:च्या नावावर डिपॉझिटसह 5 लाख 19 हजार 58 रूपयांची रोकड आहे.