आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Patil News In Marathi, Vikhe Patil, Congress, Aurangabad Lok Sabha Seat

प्रतिस्पर्ध्‍याऐवजी नितीन पाटलांना स्वकीयांचाच धोका,विखेंनी आधीच दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस उमेदवाराला काँग्रेसमधील दुफळीच पाडते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या वेळीही काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांना स्वपक्षीयांकडूनच धक्का बसू शकतो. औरंगाबाद काँग्रेसमध्ये भलत्याच भानगडी चालतात. ‘ते बोलतात एक अन् करतात एक’, असा इशारा औरंगाबादचे माजी पालकमंत्री तथा कृषिमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी गत आठवड्यात औरंगाबादेत झालेल्या बैठकीत दिला होता.
काँग्रेसचा उमेदवार एकमताने ठरत नाही. त्यामुळे एका गटाचा उमेदवार ठरला तर दुसर्‍या गटाची नाराजी त्याला भोवते. गेल्या तीन वेळा काँग्रेसच्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा शिवसेनेचे चंद्रकांत खैरे बरे असे काँग्रेसजनच सांगत होते. त्यामुळे सलग तीन वेळा येथून काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. खैरेंच्या विक्रमात शिवसेनेपेक्षा काँग्रेसचाच मोठा हात असल्याची चर्चा कायम होत राहते. दोन्ही पक्षातील अभद्र युतीची तर जाहीर वाच्यता करण्यात येते. गतवेळी पराभवाचा सामना बघितलेले उत्तमसिंह पवार यांनी या वेळी प्रथमपासूनच पुन्हा लोकसभा लढवण्याची तयारी चालवली होती. पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, असे गृहीत धरून त्यांनी प्रचारही सुरू केला होता. दुसरीकडे कन्नडमधून विधानसभेतून या वेळी आमदारकी मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे गतवेळी तेथून पराभूत झालेले नितीन पाटील यांनीही आखाड्यात उडी घेण्याची तयारी सुरू केली होती. र्शेष्ठींना ज्यांना उमेदवारी द्यायची होती ते शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि डॉ. कल्याण काळे यांनी नकार दिल्यामुळे पवार आणि पाटील हेच स्पर्धेत होते. पंधरा दिवसांपूर्र्वी गांधी भवनात पक्ष निरीक्षक उमेदवारांची चाचपणी करत असताना दोघांच्या समथर्कांत तुंबळ हाणामारी झाली होती.


पक्षाने पाटील यांना उमेदवारी जाहीर करताच पवार यांनी बंडाचे संकेत दिले. आता त्यांनी दोन दिवसांची मुदत दिली असून ते लढण्याची चिन्हे सध्यातरी जास्त आहेत. मात्र त्यांना शांत करण्यात पक्षाला यश आले तरी ते पाटील यांचा प्रचार करणार नाहीत.


यापूर्वीचा इतिहास
1999 मध्ये काँग्रेसने येथून माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा लोकसभेसाठी माजी खासदार रामकृष्णबाबा इच्छुक होते. मात्र बाहेरच्याला उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी गावोगाव जाऊन अंतुलेंच्या विरोधात प्रचार केला. परिणामी अंतुले पराभूत झाले.


2004 मध्ये स्वत: रामकृष्णबाबा मैदानात होते. तेव्हा अंतुले समथर्कांनी दणका दिला. परिणामी पुन्हा खैरे विजयी झाले. 2009 मध्ये पुन्हा रामकृष्णबाबा इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळत नसेल तर मराठा उमेदवार द्यावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र उत्तमसिंह पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मराठा लॉबी नाराज झाली. त्यातच शांतीगिरी महाराज मैदानात उतरले. मराठा लॉबीने आपली ताकद शांतीगिरींच्या मागे उभी केली. वैजापुरात रामकृष्णबाबा तर कन्नडमधून नितीन पाटील यांनी उत्तमसिंहांच्या विरोधात काम केले. परिणामी पुन्हा खैरे विजयी झाले.


या वेळी पाटील मैदानात राहिले तर पवार सर्मथक त्यांच्या विरोधात काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवार यांच्या इच्छेनुसार तर पाटील यांची उमेदवारी बदलून ती पवार यांना दिली तर मराठा लॉबी पुन्हा खैरेच बरे म्हणण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा परिणाम पहिल्यासारखा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


गतवेळी पाटील होते पवारांच्या विरोधात
गतवेळी उत्तमसिंह पवार यांच्या विरोधात काम केल्याची जाहीर कबुली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कन्नड येथे गत पंधरवड्यात पाटील यांनी दिली. पवारांच्या पराभवात पाटलांचा वाटा होता हे जाहीर झाले आहे. आता पाटील यांची उमेदवारी जर कायम राहिली तर पवार पाटील यांचा प्रचार करणार नाहीच. मला पाडणार्‍यांचा प्रचार मी कसा करणार, असा सवाल पवार यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीरपणे केला होता. त्यामुळे ते प्रचार करणार नाहीत हे स्पष्ट आहेच. शिवाय पुन्हा खैरेच बरे अशी भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला काँग्रेसच पाडणार हेही अधोरेखित होते.