आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्मिळ वारसा: निझामकालीन पत्रव्यवहारांचे डिजिटलायझेशन होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 1938 ते 1952 या निझामाच्या कालखंडातील सर्व पत्रव्यवहारांचा नागेश्वरवाडी येथील स्वामी रामानंद तीर्थ संस्थेत संग्रह करण्यात आला आहे. 26 खंडांतील साडेदहा हजार पानांच्या या दुर्मिळ पत्रव्यवहाराचे डिजिटलायझेशन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नव्या पिढीलादेखील स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासह तत्कालीन पत्रव्यवहार आणि इतिहास कळण्यास मदत मिळणार आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी या पत्रांच्या डिजिटलायझेशनसाठी येणारा आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

मुक्तिसंग्राम चळवळीच्या वेळी समकालीन घटनांचा मागोवा घेणारे दस्तऐवज, स्वामीजींचा पत्रव्यवहार, टंकलिखित बातम्या, गोपनीय अहवाल, स्टेट काँग्रेसच्या चळवळीचे ठराव, 1938 ते 1952 या कालखंडातल्या तत्कालीन नेत्यांनी साधलेला संवाद यात आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच तत्कालीन नेत्यांना लिहिलेली पत्रेही या खंडांमध्ये आहेत. या पत्रव्यवहारांचे 26 खंड असून त्याची 10,425 पाने आहेत. यामध्ये 25 मार्च 1952 रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांनी लालबहादूर शास्त्री यांना लिहिलेल्या पत्राचाही समावेश आहे. तसेच स्टेट काँग्रेसचे ठराव, निझामाची पत्रे, तत्कालीन अहवालांचे संकलनही आहे. मात्र कागदाच्या स्वरूपात असलेला हा दुर्मिळ वारसा नाश होण्याच्या मार्गावर आहे.

असे होणार डिजिटलायझेशन : मुक्तिसंग्रामाच्या वेळी मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक तपशील या 26 खंडांमध्ये आहे. त्यामुळे नव्या पिढीला निझामकालीन परिस्थिती तसेच रझाकारांच्या काळातील घटनांची माहिती मिळणार आहे. त्या काळातल्या घटनांसंदर्भात दैनिकांमध्ये आलेल्या बातम्याही या खंडांत आहेत. मात्र गेल्या 70 पेक्षा अधिक वर्षांपासूनचे हे दस्तावेज खराब होत असल्यामुळे त्याचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सुरू असताना आमदार सतीश चव्हाण यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी यासाठी लागणारा आर्थिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्याची माहिती संस्थेचे संचालक शरद अदवंत यांनी दिली.