आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहाची समस्या सोडवण्यात मनपा अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्या महानगरपालिकेत महिला महापौर आहेत त्याच ठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये बीभत्स लिखाण करून महिला कर्मचार्‍यांचा मानसिक छळ होत आहे. परंतु महापौर कला ओझा व 40 नगरसेविका मात्र ही समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्या आहेत. ‘मी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापरच करत नाही, मग तुम्ही सारखे सारखे मला फोन का करता?’ असे म्हणत ओझा यांनी स्वच्छतागृहाची समस्या सोडवण्याबाबत असर्मथता दर्शवली.
अपमानास्पद आणि महिलांना शरमेने मान खाली घालायला लावणारे बीभत्स लिखाण अनेक वर्षांपासून मनपाच्या स्वच्छतागृहात होत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 28 जानेवारी रोजी प्रकाशित केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर उच्चपदस्थ महिलांनी याची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, महापौर आणि नगरसेविकांनीही याची दखल घेतली नाही. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास महापौर प्रतिसाद देत नाहीत, तर नगरसेविकांकडे मनपात काम करणार्‍या भगिनींची व्यथा जाणून घेण्यासाठी वेळच नाही. यामुळे हा लाजिरवाणा प्रकार समोर येऊनही महापौर मूग गिळून गप्प आहेत. यावरून नगरसेविका पद भूषवताना काही कामेही करावी लागतात याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडू
महिलांच्या स्वच्छतागृहात हा प्रकार होतो हे बातमीमुळे कळाले. ही बाब लज्जास्पद असून आपण आतापर्यंत कधी मनपाच्या स्वच्छतागृहाचा वापर केला नाही. परंतु महिलांची ही समस्या सर्वसाधारण सभेत मांडू. कचरापेटीदेखील स्वच्छतागृहात नाही. कीर्ती शिंदे, नगरसेविका
आम्हीच आता सतर्क राहू
उजेडात आलेला हा प्रकार गंभीर आहे. आता आम्ही नगरसेविका सतर्क राहून अधूनमधून महिला कर्मचार्‍यांच्या स्वच्छतागृहाचा वापर करू. रेखा जैस्वाल, नगरसेविका
मला सारखे फोन का करता ?
मी किंवा नगरसेविका हे स्वच्छतागृह वापरत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी आहेत. त्यांना प्रश्न विचारा. मला सारखे फोन का करता? कला ओझा, महापौर
त्यात काय एवढं?
मी पाहणी करण्यासाठी सेविका महिलेस पाठवले होते. या ठिकाणी लिखाण केलेले आहे. पण त्यात काय एवढं? असा प्रतिसवाल ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींना केला. प्रीती तोतला, नगरसेविका
समस्या जाणून घेण्यास महिला पदाधिकार्‍यांना वेळच नाही
नगरसेविकांचे मोबाइल पतींकडे
महिला स्वच्छतागृहातील गंभीर समस्येकडे महिला नगरसेविकांचे लक्ष आहे की नाही यासंदर्भात दूरध्वनीवर संपर्क साधला असता केवळ दोनच महिला नगरसेविकांनी स्वत: माहिती दिली. त्यापैकी बहुतांश महिला नगरसेविकांचे मोबाइल त्यांच्या पतींकडेच होते. त्यामुळे त्या स्वत: फोनवर बोलू शकल्या नाहीत.महानगरपालिकेत स्वच्छतागृहातील भिंतींवर बीभत्स लिखाण करून महिलांचा छळ होत असताना 40 नगरसेविकांनी स्वच्छतागृहाची पाहणी करणे तर सोडाच, महिला कर्मचार्‍यांसोबत संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. या प्रश्नावर दाद मागायची तर कुणाकडे, असा प्रश्न महिला कर्मचार्‍यांना पडला आहे.