आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव हाणून पाडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पदाधिका-यांनी आपापल्या भागासाठी रस्त्यांची ३० कोटी रुपयांची कामे ऐनवेळी घुसवून मंजूर करण्याचा घाट सर्वपक्षीय नगरसेवकांनी उधळून लावला. सर्वसाधारण सभेआधीच्या बैठकीत सगळ्याच नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. त्यातून मार्ग काढण्याचा पदाधिका-यांचा प्रयत्न सपशेल फसला. सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करून सत्ताधारी नगरसेवकांनीच असा प्रस्ताव आणणार नाही असे शहर अभियंत्यांकडून वदवून घेतले.

मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी फक्त दोन सर्वसाधारण सभा होऊ शकतात हे ध्यानात घेऊन शेवटच्या टप्प्यात ३० कोटी रुपयांची कामे आपापल्या वाॅर्डात करून घ्यायचा बूट पदाधिका-यांनी काढला होता. गेल्या काही दिवसांपासून त्या हालचालीही सुरू होत्या. पण या प्रकाराची कुणकुण काल इतर नगरसेवकांना लागली व त्यांनी हा बेत हाणून पाडण्याचे ठरवले.
इतर नगरसेवकांच्या वाॅर्डात काही हजारांची कामेही होणे दुरापास्त असताना पदाधिकारी घिसाडघाईने व गुपचूप डाव साधत असल्याचे समोर येताच संतापलेल्या या नगरसेवकांनी एकच हल्लाबोल केला. भाजपचे सुरेंद्र कुलकर्णी यांनी असा कोणताही प्रस्ताव ऐनवेळचाविषय म्हणून आणू नका असे सांगत इशारा देणारे पत्र महापौरांना दिले. याशिवाय सर्वसाधारण सभेच्या आधी महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आमच्या वाॅर्डात कामे होत नसताना ही कामे कशी करता असा सवाल करीत आधी राहिलेली कामे पूर्ण करा अशी मागणी केली. काहींनी तर तुम्हाला एवढेच वाटते तर ५० कोटींची कामे काढा व ती सगळ्या नगरसेवकांत वाटा असे सांगत या प्रस्तावाला विरोध केला. नगरसेवकांना बाबापुता करून समजावण्याचा प्रयत्नही पदाधिका-यांनी केला. पण त्याला यश आले नाही.

सभागृहातही रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय सुरू असताना सत्ताधारी राजू वैद्य यांनी ३० कोटींच्या प्रस्तावाचा विषय काढला. असा प्रस्ताव आणू नका, उलट अपूर्ण कामे आधी करा असे ते म्हणाले. खेडकर यांनी असा प्रस्ताव आला आहे का असा थेट सवाल करीत शहर अभियंता पानझडे यांना असा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न झाला तर खपवून घेणार नाही असे सांगत त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही असा सूचक दम भरला. वैद्य, खेडकर यांना अफसर खान यांनीही जोरदार पाठिंबा दिला. त्यांनी मग पानझडे यांच्याकडून असा प्रस्ताव मांडला जाणार नाही असे जाहीर वदवून घेतले.

शेवटपर्यंत प्रयत्न : आतापर्यंत ऐनवेळच्या प्रस्तावात महत्त्वाचे विषय आणले जातात. सदस्यांना माहीतही होत नाही आणि गुपचूप ते मंजूर केले जातात. काही विषय तर नंतर ऐनवेळचे म्हणूनही घुसडले जातात. ही परंपरा माहीत असल्याने नगरसेवक अफसर खान यांनी हा प्रस्ताव असा घुसडला जाऊ नये यासाठी आक्रमक रूप घेतले. राष्ट्रगीत झाल्यावर ते महापौरांच्या आसनाकडे धावले व खबरदार प्रस्ताव घुसवाल तर असे सांगत त्यांनी नगरसचिव पठाण यांनाही असे न करण्याचा इशारा दिला. उपमहापौरांनी त्यांना
बाजूला केले.