आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Accommodation At The Bamu For Hotel Management

हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी विद्यापीठात नगण्य सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘लंच होम’मध्ये सुरू होणारा हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम आणखी दोन-तीन महिने सुरू होणे शक्य नाही. ‘लंच होम’चे बांधकाम पूर्ण झाले. पण छत उभारण्यासाठी आणखी महिना लागणार आहे. दरम्यान, युरोपचा अभ्यास दौरा आटोपून व्यवस्थापन परिषद सदस्य शुक्रवारी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने ‘कोर्स’चा आढावा घेतला असता ‘एमजीएम’ आणि ‘आयएचएम’च्या तुलनेत विद्यापीठात काहीच सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले.
विद्यापीठाला ‘ए’ मानांकन मिळवण्यासाठी ‘लंच होम’ प्रस्तावित आहे. एप्रिल-२०१४ मध्ये ९२.७८ लाख रुपये खर्चाचे बांधकाम सुरू झाले. ३४ लाखांच्या ‘इम्पोर्टेड रूफ’सह हा खर्च कोटी २७ लाखांवर गेला. आकर्षक इमारत उभारली गेली. मात्र नंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तेथेच ‘हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेऊन सात जणांची समिती गठित केली. बीसीयुडी संचालक डॉ. के. व्ही. काळे समितीचे सचिव आहेत. एमजीएमच्या हर्षा पोलकम आणि आयएचएम-एचे प्राचार्य डॉ. सतीश जयराम यांनी ‘लंच होम’ची एकदा पाहणी केली. समितीने अभ्यासक्रम आणि पायाभूत सुविधांविषयी विद्यापीठाला काही सूचना केल्या आहेत. विद्यापीठाने त्यांच्याच मदतीने अभ्यासक्रमाची रचना करण्याचे ठरवले आहे. तरीही १४ लाख रुपये खर्च करून व्यवस्थापन परिषद सदस्यांचा कौटुंबिक युरोप दौरा कुलगुरूंनी घडवून आणला. १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर काही निर्णय होण्याची शक्यता असल्याचे डॉ. काळे यांनी म्हटले आहे. लंच होममध्येच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर बीटेक आणि एमटेकचेही अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक सत्रासाठी ६० हजार रुपये शुल्क असेल. मात्र ‘लंच होम’ तयार नसल्यामुळे ‘कोर्स’ सुरू होण्यात अडथळा आहे.
कोटी २७ लाख रुपये खर्चून सुसज्ज लंच होम उभारले खरे, मात्र त्यानंतर येथेच हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला. त्यामुळे येथे पायाभूत सुविधा सध्या तरी उपलब्ध नाहीत. ‘लंच होम’मध्ये सध्या डबे खाण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वतंत्र हॉल उभारले आहेत. प्रवेशद्वारावरच दोन स्वच्छतागृहे, एक किचन आणि दोन स्टोअर रूम्स आहेत. या ‘लंच होम’वर छत उभारण्याचे काम झालेले नाही. कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांनी ‘लंच होम’चे काम उत्तम केले आहे.
सध्या पायाभूत सुविधा नाहीत
हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी सध्या पायाभूत सुविधा नाहीत. मात्र ‘लंच होम’चेही काम अपूर्ण असल्याने आणखी दीड ते दोन महिने लागतील. इतर निर्णय १६ ऑगस्टच्या बैठकीत होतील, अशी आशा आहे. डॉ.के. व्ही. काळे, बीसीयुडी संचालक.
-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पंचतारांकित हॉटेल हवे - विदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होणे गरजेचे आहे.
-विद्यार्थ्यांना विदेशी हॉटेलात प्रशिक्षण घेण्याची सुविधा हवी.
-प्रयोगशाळा म्हणून सुसज्ज स्वयंपाक घर हवे.
-वातानुकूलित डिलक्स उपाहारगृह पाहिजे.
-भव्य ‘रिसेप्शन’ गरजेचे.
-स्वीमिंग पूल, गार्डन रेस्टॉरंट, निवास व्यवस्थेच्या हॉटेलची गरज.

विश्रामगृह सुसज्ज होणार
विश्रामगृहसुसज्ज केले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटींचा निधी मिळाला अाहे. विद्यापीठाचाही काही कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहात चांगल्या सुविधा देण्याचा विचार आहे. हॉटेलच्या धर्तीवर येथे निवास व्यवस्था केली जाईल. लंच होममधील रेस्टॉरंटच्या आधारे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील.
१२३२ चौरस मीटर बांधकाम
०१ एकर लंच होमचा परिसर
०१ कोटी २७ लाख खर्च