आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय डेंटल कॉलेजात 'प्रवेश बंद'ची शिफारस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ मराठवाडाच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील विद्यार्थ्यांना दंतवैद्यकचे शिक्षण देणाऱ्या शासकीय दंत महाविद्यालयातील प्रवेश बंद करा, अशी शिफारस केंद्रीय दंत परिषदेने आरोग्य मंत्रालयाला केली आहे. पायाभूत सुविधा नाहीत. उपकरणांचा एवढा तुटवडा असताना विद्यार्थ्यांना कसे शिकवणार, असा सवाल परिषदेच्या सदस्यांनी केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय म्हणजे घाटीच्या अंतर्गत हे महाविद्यालय आहे. तेथे सध्या सुमारे २५० विद्यार्थी शिक्षण घेतात तर ५० प्राध्यापक कार्यरत आहेत. जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेवरून दंत परिषदेचे पथक महाविद्यालयात तपासणीसाठी आले होते. दोन दिवसांच्या काळात पथकातील निरीक्षक, सदस्य डॉ. आर. गौरम्मा चित्रदुर्गा आणि डॉ. मुनीशकुमार सुनाम यांनी प्रत्येक विभागाला भेट दिली. तेथील सुविधांची पाहणी केली आणि कमालीचे आश्चर्य व्यक्त केले. दंत महाविद्यालयातील विभाग नेमके कसे असावेत, त्यात कोणती उपकरणे असावीत, याचे काही निकष दंत परिषदेने ठरवून दिले आहेत. ते पाळले गेले नाहीत, असे समितीच्या निदर्शनास आले. या पाहणी दौऱ्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ई-मेल वर पाठवण्यात आला. तो प्राप्त झाल्यावर दंत परिषदेचे अवर सचिव एम. एल. मीना यांनी २५ एप्रिल २०१६ रोजी याच महाविद्यालयात झालेल्या संयुक्त पाहणीचा अहवालही मागवून घेतला. त्यात डॉ. अल्पेश पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही अशाच स्वरूपातील मुद्दे मांडले होते. दोन्ही अहवाल एकत्रित करून ११, १२ जून रोजी नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली.

बैठकीत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत एम. एल. मीना यांनी एक सविस्तर पत्र दंत महाविद्यालयाला पाठवले. त्यात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयात बीडीएसच्या तृतीय वर्षाला परवानगी देऊ नये, अशी शिफारस केंद्रीय दंत परिषद करत आहे. केलेल्या शिफारशींमागे त्यांनी कारणे दिली आहेत.

१] ओरल पॅथॉलॉजीचे प्रोफेसर डॉ. सुरेश बारपांडे प्रतिनियुक्तीवर मुंबईला गेले आहेत.
२] प्रत्येक विभागात किमान दोन प्रोफेसरची पदे रिक्त आहेत.
३] पेडोडॉटिक्स विभागात प्रपाठकाचे पद रिक्त आहे.
४] डेंटल चेअर, नीडल बर्नर, सिरिंज कटर, अल्ट्रासोनिक क्लीनर, रबर डॅम किट, अॉटोमॅटिक डेव्हलपर, वॅक्स हीटर, मॉडेल ट्रिमर, कार्बोरँडम डिस्क, डायमंड डिस्क, पल्प टेस्टर, बायोप्सी किट, पोर्टेबल डेंटल चेअर आदी अत्यंत महत्त्वाची उपकरणेच नाहीत.

आढावा बैठक घेतली
दरम्यान,आमदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी बुधवारी दंत महाविद्यालयाच्या समस्यांविषयी आढावा बैठक घेतली. निधीची कमतरता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन डॉ. पांडे यांनी दिले.

युतीचे सरकार ढोंगी
युतीच्या मंत्र्यांकडून भाषणांमध्ये मराठवाड्याचा कळवळा दाखवला जातो. प्रत्यक्षात कामांसाठी निधी दिला जात नाही. मंजूर कामेही होत नाहीत हे दंत महाविद्यालयाच्या बिकट अवस्थेवरून लक्षात येते. युतीचे सरकार मराठवाड्यावरील प्रेमाचे ढोंग करणारे आहे. इम्तियाज जलील, आमदार,एमआयएम

पायाभूत सुविधांची अवस्था
शिफारसपत्रातपायाभूत सुविधांची काय अवस्था आहे याचा तक्ता जोडण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, प्री क्लिनिकल प्रोस्थोडोंटिक्स अँड डेंटल मटेरियल, प्री क्लिनिकल प्रयोगशाळेसाठी प्रत्येकी १५०० चौरस फुटांची जागा आवश्यक आहे. प्रत्यक्षात तेथे ११८४ चौरस फूट जागा उपलब्ध आहे. ओरल बायोलॉजी, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा १३०० चौरस फुटात असावी, असे बंधन असताना ८०६ चौरस फूट जागेत काम सुरू आहे. ओरल पॅथॉलॉजी फॉर हिस्टोपॅथॉलॉजीसाठी ४०० फुटांऐवजी ३९० चौरस फूट जागा आहे.
बातम्या आणखी आहेत...