आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना असूनही अपंगांंना लाभ नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीयूष द्विवेदी यांना पुरस्कार देताना सामाजिक न्याय विशेष साह्य मंत्री राजकुमार बडोले, खासदार सुप्रिया सुळे, राजेश टोपे, साहित्यिक रा. रं. बोराडे आदी.
औरंगाबाद - विशेष व्यक्तींसाठी ज्या पद्धतीने काम व्हायला हवे ते होत नाही. ज्या विभागांतर्गत या व्यक्तींसाठी काम करायचे आहे ते अधिकारीदेखील सामाजिक जबाबदारीऐवजी नोकरी म्हणूनच तेवढ्यापुरतेच काम करत आहेत. त्यामुळे योजना असूनही विशेष व्यक्तींना त्याचा योग्य तो लाभ मिळत नसल्याने त्यांना न्याय दिला जात नाही, अशी खंत सामाजिक न्याय विशेष साह्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
गुरू लॉन्स येथे साहित्य सांस्कृतिक मंडळ पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई (अपंग हक्क विकास मंच)च्या वतीने सहावे अखिल भारतीय विशेष व्यक्तींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी १४ जानेवारी रोजी विशेष सत्रात ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी उच्च तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार हेमंत टकले, डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. रवींद्र नांदेडकर, वैकुंठ कुंभार, रामदास म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सचिन मुळे, सुहास तेंडुलकर यांची उपस्थिती होती.

बडोले म्हणाले की, विशेष व्यक्तींसाठी प्रत्यक्ष कृतीयुक्त काम करण्याची आज गरज आहे. सामाजिक दायित्व प्रत्येकाने पार पाडण्याची गरज आहे. त्यांना कुणाच्याही दयेची भीक नको आहे, तर प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाल्यास ही व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करते आहे. विशेष शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी या खात्याने समिती स्थापन केली आहे. ही समिती जिल्हा आणि तालुकास्तरावर काम करणार आहे. जी सामान्य व्यक्ती विशेष व्यक्तीसोबत विवाह करेल त्या व्यक्तीला शासनातर्फे ५० हजार रुपयांची तरतूद मदत निधीत केली आहे. एवढेच नाही, तर आता संजय गांधी निराधार योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली असून, ही रक्कम एक हजार करण्यात आली आहे. तसेच राज्यभर हेल्पलाइन आणि मार्गदर्शन केंद्रे राज्य सरकार सुरु करणार असल्याचेही बडोले म्हणाले. विशेष व्यक्तींना पुढे आणण्यासाठी समजाशी एकरूप होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. आमदार हेमंत टकले म्हणाले, दया आणि याचनेची भावना संपुष्टात आणण्यासाठी विशेष व्यक्तींच्या शिक्षणात गुणात्मक बदल होणे आवश्यक आहे. त्याबरोबरच नव्या साहित्यातून नवा प्रवाह निर्माण व्हावा, असेही ते म्हणाले.

या वेळी पुरस्काराचे वितरण शिवाजी गाडे धर्मेंद्र सातव यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्कार ग्रुप, पुणे यांच्यातर्फे संस्कार भूषण पुरस्कार पीयूष द्विवेदी (साहित्य), गजानन वाघ (प्रशासकीय सेवा), कोमल बोरा (क्रीडा), चेतना अपंग मतिविकास संस्था यांना देण्यात आला. तसेच तारामती बाफना अंध विद्यालय, औरंगाबाद यांना अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेल लिपीतील पुस्तके देण्यात आली. यानंतर सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत खंडेराव मुळे, राजेश ठाकरे, परिमल भट्ट, पवन खेबुडकर यांच्या यशोगाथेविषयी प्रगट मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी अश्विनी दाशरथे यांनी या यशवंतांशी संवाद साधला, तर दुपारच्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रमही झाला.

समाजात अनेक व्यक्ती नेत्याप्रमाणे काम करत असतात. विशेष व्यक्तींचादेखील यात समावेश आहे. या व्यक्तीदेखील सक्षमपणे काम करत आहेत. त्यांच्याकडे बघूनच प्रेरणा मिळते. कमतरता प्रत्येकात असते. फक्त काम चांगले करायला हवे. संक्रांतीचा सणही आहे. आता काही इलेक्शनही नाहीत. तेव्हा सरकारने तिळगूळ घेऊन वर्षभर तरी गोड बोलावे, अशा शुभेच्छा सुळे यांनी राजकीय व्यासपीठ नाही, असे म्हणत दिल्या.