आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तघटकांचा तुटवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिवाळीच्या आधीपासूनच रक्तदान शिबिरांची संख्या एकीकडे नगण्य झाली आहे, तर दुसरीकडे डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची मागणी दुपटीने वाढली आहे. परिणामी शहरातील सगळ्याच रक्तपेढय़ांमध्ये रक्त व रक्तघटकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अगदी सर्वसामान्य ‘ब्लड ग्रुप’चे रक्तघटक मिळवण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. रक्ताचा फ्रेश स्टॉक नसल्याने प्लेटलेट्स तयार करण्यासाठीही अनेक अडचणी येत असून महागडे सिंगल डोनर प्लेटलेट्स घेण्याची वेळ येत आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच रक्तदान शिबिरांची संख्या जवळजवळ नगण्य झाली होती. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत शहरात शिबिरे जवळजवळ झालीच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच रक्तपेढय़ांमध्ये आजही रक्ताचा साठा (स्टॉक) नसल्याचे चित्र आहे. प्लेटलेट्ससाठी फ्रेश स्टॉक लागतो; परंतु स्टॉक नसल्याने प्लेटलेट्स देण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात लोकमान्य रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र तायडे म्हणाले, आमचे प्रमुख रक्तदाते हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. मात्र सुट्यांमुळे विद्यार्थी बाहेरगावी असल्याने शिबिरे बंदच आहेत. त्याचा परिणाम म्हणून तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढली असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी तारांबळ होत आहे.

अमृता रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी केशव वाघ म्हणाले, फ्रेश स्टॉक नसल्याने सिंगल डोनर प्लेटलेट्स देण्याची वेळ आली आहे. मागणीच्या केवळ 50 टक्के पुरवठा करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्पण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी रफिक खान यांनीही, सध्या रक्ताचा साठा शून्यवत असल्याचे सांगितले. केवळ रिप्लेसमेंटवर रक्तपेढी सुरू आहे, तर एमजीएम रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौतम कोरान्ने यांच्यानुसार, महिन्यापासून अशीच स्थिती आहे. सुदैवाने सोमवारपासून शिबिरांना सुरुवात झाली असल्याने आता निदान यापुढे तरी अडचण येणार नाही, अशी आशा घाटीतील डॉ. हेमंत कोकंडकर यांनी व्यक्त केली. अनावश्यक प्लेटलेट्स देणे थांबले तर रुग्णांचा खर्च वाचेल व तुटवडाही नक्कीच कमी होऊ शकतो, असे डॉ. सुहास रोटत्यांनी सांगितले. रक्तदान शिबिरांसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.