आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास प्रस्ताव बारगळल्यात जमा; भाजप म्हणतो, बकोरियांना हटवण्यापेक्षा काम करून घेऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘गेंड्याच्या कातडी’वरून सुरू झालेल्या वादानंतर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी सरसावलेल्या पक्षांनी एक एक करीत काढता पाय घेतला आहे. एमआयएमने कालच आयुक्त हटावला विरोध असल्याचे स्पष्ट केले, तर भाजपने आयुक्तांना हटवण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेऊ, अशी भूमिका घेतल्याने शिवसेना एकाकी पडली आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाचा मुद्दा बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे नगरसेवक जफर बिल्डर यांनी गेल्या आठवड्यात सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना उद्देशून ते गेंड्याच्या कातडीचे आहेत, असे उद््गार काढले होते. हे उद््गार सहन झाल्याने आयुक्त ओमप्रकाश बकोरिया सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन सभागृहाबाहेर निघून गेले. त्यांनी माफी मागण्यासही स्पष्ट नकार दिला. यामुळे आयुक्तांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणारच असे सगळेच पक्ष शड्डू ठोकून सांगत होते. पण नवीन आठवडा सुरू होईपर्यंत परिस्थिती बदलली. शिवसेनेचे पदाधिकारी पालकमंत्री रामदास कदम यांना खेडमध्ये भेटून आले. कदम यांनी तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, असे सांगत पदाधिकाऱ्यांना परत पाठवले. तिकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना गळ घालून पाहिली. पण त्यांनीही टोकाचे पाऊल उचलू नये, असेच सांगितले. तिकडे कार्यक्षम अधिकारी हटवताना एमआयएमच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा शिवसेना भाजपचा गेमप्लॅन यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत प्रस्तावाच्या बाजूने राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना एकटी पडली.
बंद दाराआड झाली चर्चा
प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून स्पष्ट हिरवा कंदील मिळाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना गळ घातली. त्यानुसार आज बागडे यांनी भाजप कार्यालयात सर्व नगरसेवकांचे म्हणणे एेकून घेतले. या बैठकीत बागडे, आमदार अतुल सावे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पक्षाची भूमिका समजावून सांगितली.
सरकार आपलेच; हे योग्य नाही
सूत्रांनी सांगितले की, मनपात राज्यात सत्तेत असताना आयुक्त हटावची भूमिका घेणे म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे, असा संदेश जातो. त्यामुळे आयुक्त हटवण्यापेक्षा सत्तेचा वापर करून आयुक्तांकडून काम करून घेऊ, असे नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. नगरसेवकांचे प्रश्न आयुक्तांकडून सोडवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे बागडे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तनवाणी म्हणतात, विकासावर चर्चा
बंद दाराआडच्या बैठकीबाबत आमदार अतुल सावे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले की, आयुक्त हटावबाबत ही बैठक नव्हतीच. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शहरात येत आहेत. त्या वेळी त्यांना भेटून विकास कामांबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...