आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद शहरातील रस्ते दुरूस्तीसाठीचा डांबर पुरवठा थांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाऊस थांबून पंधरवडा उलटल्यावरही शहरातील हजारो खड्डे डांबराने बुजवण्याचे काम वेगात सुरू झाले नाही. दोन दिवसांपासून या कामासाठी होणारा डांबराचा पुरवठा बंद झाल्याने शहराच्या सगळय़ा भागांत मनपा कृपेने अंथरलेल्या 20 हजारहून अधिक खड्डय़ांचे अडथळे नागरिकांना वाकुल्या दाखवत आहेत.

शहरातील रस्त्यांची दैना झाली असून एकही रस्ता विनाखड्डा राहिलेला नाही. पावसाळय़ात या खड्डय़ांचे आकार आणखी अक्राळविक्राळ झाले असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यासंदर्भात मनपा प्रशासन गांभीर्याने हालचाल करीत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे. 14 जुलैपासून ‘दिव्य मराठी’ने ‘रस्त्यांची दहशत’ या मालिकेतून खड्डय़ांची समस्या लावून धरली आहे. त्यानंतर नागरिकांचा संतापही वाढला. हे ध्यानात घेऊन मनपाने गेल्या महिन्यापासून वेट मिक्स अर्थात मुरूम, खडी, दगड वापरून हे खड्डे तात्पुरते बुजवले. पण पावसात ते वाहून गेल्याने प्रश्न तसाच कायम आहे.

आदेशानंतरही हालचाल मंदच
मनपाकडे रस्ता दुरुस्तीसाठी पुरेसा पैसा नाही, कंत्राटदार काम करीत नाहीत, अशी अवस्था असताना महापौर कला ओझा यांनी पाऊस थांबल्यानंतर करा आणि मोठे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवा, असे आदेश दिले. पेव्हर ब्लॉकसाठी सहाही वॉर्डांसाठी मिळून 1 कोटी 20 लाख रुपयांची तातडीची तरतूद करून देण्यात आली.

पाऊस थांबूनही काम नाही
गेल्या 15 दिवसांपासून पाऊस थांबला आहे. मात्र, मनपाने डांबर वापरून खड्डे बुजवण्याचे काम केलेले नाही. दोन दिवसांपूर्वी व्हीआयपी रोड आणि इतर काही ठिकाणचे खड्डे बुजवले, पण नंतर काम थांबले. कंत्राटदारांच्या डांबराच्या प्लांटमधून पुरवठा बंद झाल्याने हे काम ठप्प झाल्याचे समोर आले आहे. कटारिया, सिद्दिकी, आर. के. कन्स्ट्रक्शन, एएस कन्स्ट्रक्शन यांचे हे प्लांट आहेत.

समांतरमुळे अनेक कामे रखडली
शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांचे सर्वेक्षण मनपाने केले नसले तरी 20 हजारांहून अधिक खड्डे शहरात आहेत. हे सर्व खड्डे बुजवण्यासाठी मनपा 4 कोटी 70 लाख रुपये खर्च करणार आहे. पानझडे म्हणाले की, काही रस्त्यांवर तर पॅचवर्कही कामाचे नाही, तेथे पूर्ण रस्ताच तयार करावा लागणार आहे. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे म्हणाले की, समांतर जलवाहिनीसाठी ड्रेनेज आणि पाण्याच्या लाइनसाठी अनेक रस्ते खोदावे लागणार असल्याने अनेक रस्त्यांचे काम करता आलेले नाही. मनपाने मागील महिन्यात 12 लाख रुपये वेट मिक्सच्या कामांवर खर्च केले, पण हे खड्डे आता पुन्हा उघडे पडले आहेत.


रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च
0शहरातील रस्त्यांची लांबी : 1400 किलोमीटर
0 खड्डय़ांची अंदाजे संख्या : 20,000
0 पॅचवर्कसाठी खर्च येणार : 3 कोटी 50 लाख रुपये
0 पेव्हर ब्लॉकवर खर्च येणार : 1 कोटी 20 लाख रुपये
0 वेट मिक्सवर केलेला खर्च : 12 लाख रुपये


बिले न दिल्याने डांबर रोखले
या कंत्राटदारांकडे पॅचवर्कची कामे आहेत. त्यांचेच डांबराचे प्लांट आहेत. या सर्वांचे मनपाकडे पैसे थकले असल्याने सर्वांनीच डांबर पुरवठा रोखल्याने काम बंद पडले आहे. या सर्वांची प्रत्येकी किमान 3 कोटी रुपयांची बिले मनपाकडे अडकली असल्याचे समजते.

कंत्राटदारांवर कारवाई नाही
बिलासाठी काम रोखणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी मनपाने त्यांना चुचकारणे सुरू केले असून शुक्रवारी या कंत्राटदारांची बैठक नवे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी बोलावली आहे. यासंदर्भात पानझडे म्हणाले की, या कंत्राटदारांना ‘कन्व्हीन्स’ करणार आहोत. त्यांचे पैसे अडकले असले तरी काम झाले पाहिजे. त्यासाठी कामाचे महत्त्व पाहून पैसे दिले जातील. या बैठकीत कंत्राटदारांना पॅचवर्कबाबत सूचना देण्यात येणार आहेत.


गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवणार
दोन दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून ही कामे वेगात करण्याच्या सूचना केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या आधीच शहरातील खड्डे बुजवले जातील. शिवाय पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कला ओझा, महापौर


कंत्राटदारांना सूचना देणार
पॅचवर्कचे काम करणार्‍या कंत्राटदारांची ही जबाबदारी असून त्यांना मनपा प्रशासन सूचना देणार आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्न करणार असून शहरातील खड्डे बुजवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सखाराम पानझडे, शहर अभियंता