आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेच्या बैठकीत दादागिरीचा ‘द’ अन् वादाचा ‘व’ही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्याच्या पक्षीय राजकारणात दादागिरी करणारे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी मुंबईत बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु प्रत्यक्षात या बैठकीत दादागिरीचा ‘द’ किंवा वादाचा ‘व’ही उच्चारला गेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बैठक घेणारे सेना नेते अनिल देसाई यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही बैठक आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी होती, असे स्पष्ट केले.

शिरसाट यांनी प्रथमच सहकाऱ्यावर जाहीरपणे आरोप केले होते. आरोप करणारे शिरसाट, त्यांच्या पाठीशी आम्हीही आहोत, असे सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यापैकी कोणीही या विषयाला हात लावला नाही. खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर हेही या विषयापासून दूर राहिले. या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना आगामी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे, या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कितपत आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद नगर परिषदांच्या निवडणुकीचे काय चित्र असेल, जिल्हा परिषदेत युती करायची की नाही, तेथे शिवसेना कशी लढेल, या विषयावर फक्त चर्चा झाली. दोन तास ही बैठक सुरू होती. या दोन तासांत फक्त पुढील निवडणुका हाच चर्चेचा विषय होता.

वादाचा विषय निघाला?
अधिकृतपणेचर्चा फक्त आगामी निवडणुकांबाबत झाली असली तरी नंतर अनौपचारिक बैठकीत वादाचा विषय निघाल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेतील हा अंतर्गत वाद असून त्यावर जाहीरपणे चर्चा करण्यात येऊ नये, असे या बैठकीत ठरल्याने नेमकी काय चर्चा झाली हे बाहेर येणार नाही, याची खबरदारी सर्वजण घेत असल्याचे सांगण्यात येते. परंतु वादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असती तर नेत्यांनी आरोपांबाबत ऐकून घेतले, असे सांगण्यात आले असते. १७ सप्टेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदेश दौऱ्यावरून परत येत असून त्यानंतर कदाचित पुन्हा बैठक होऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे.

चर्चा होण्यात दानवेंची सरशी
मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीला नाही, तरीही केवळ औरंगाबादचे पदाधिकारी मराठवाड्याच्या निवडणुकांवर चर्चा करतात, हे शिवसैनिकांच्या फारसे पचनी पडणारे नाही. या बैठकीत दानवे-शिरसाट यांच्या वादाचा मुद्दाच चर्चेला निघाला नसेल तर ती बाब दानवे यांची सरशी ठरणारी आहे. दानवेच पक्ष चालवतात, असा शिरसाठ यांचा आरोप होता. त्यावरच चर्चा होणार नसेल याचा अर्थ श्रेष्ठी दानवेंच्या बाजूने ठामपणे उभे आहेत, असा होतो, अशी चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...