आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल इंडियाचे स्वप्न भंगले, शाळांमधील संगणक अडगळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज - 'चला शिकूया, पुढे जाऊया’ यासाठी सर्वशिक्षा अयिभानांतर्गत विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेच्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून संगणक संच बसविण्यात आले. तर केंद्र शासनाने गावखेडे डिजिटल करण्यावर भर देत गावांचा कारभार शहराप्रमाणेच ऑनलाइन करण्यावर भर देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामीण भागात मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांमध्ये दिलेले संगणक नादुरुस्त व वीजपुरवठ्याअभावी अडगळीत पडल्याने केंद्राच्या डिजिटल इंडियाच्या मंत्राला एकाप्रकारे खो दिला आहे. तर संगणक दुरुस्तीसाठी वेगळा निधी नाही शक्य झाल्यास लोकसहभागातून संगणक दुरुस्त करण्याचा अजब सल्ला जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोगल यांनी दिला आहे.

शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणक बसविण्यात आले. मात्र, विविध कारणांनी हे संगणक अडगळीत पडले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित असल्याने तर काही शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव असल्याने हे संगणक धूळ खात पडले आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या संगणकांचा विद्यार्थ्यांना फायदा होत नाही.

विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान व्हावे, त्यांचे संगणकाचे धडे गिरवून अद्ययावत ज्ञान प्राप्त करावे, या हेतूने आलेले संगणक सद्य:स्थितीत बंद आहे. सुरुवातीला संगणकासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित असल्याने संगणक बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रगत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षकांना संगणकाचे प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.

लोकसहभागातून दुरुस्ती करा
बंद पडलेले संगणक चालू करण्यासाठी मुख्याध्यापकांना सूचना देण्यात येईल. यासाठी काही अार्थिक तरतूद होते का यासाठी प्रयत्न करू, लोकसहभागातून ही दुरुस्ती करू शकता.
- आर. एस. मोगल, शिक्षणाधिकारी जि.प.
बातम्या आणखी आहेत...