आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात महिन्यांनंतरही विभागीय चौकशी अधिकारी मिळेना, शासकीय मुद्रणालयातील दलाली प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे स्टेशनजवळअसलेल्या शासकीय मुद्रणालयात नाव, आडनाव, धर्मामध्ये बदल करण्यासाठी सर्वसामान्यांची लूट करणारा लिपिक नवीद सय्यद याचे डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशनद्वारे बिंग फोडले होते. यानंतर व्यवस्थापकांनी नवीद सय्यदची विभागीय चौकशी करण्यासाठी संचालकांना प्रस्ताव पाठवला होता; पण त्याला सात महिने होत अाले तरीही अद्याप संचालकांनी या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही.

नावातील बदलासाठी होणाऱ्या खाबुगिरीचा चमूने १९ ऑगस्ट २०१५ रोजी पर्दाफाश केला होता. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून येथील कर्मचारी कशा पद्धतीने सर्वसामान्यांना पैशांची मागणी करतात, हे उघड केले होते. शिपायापासूनच ही साखळी कार्यरत होती. नावातील बदलासाठी आलेल्यांना येथील शिपाई मुद्रणालयात जाऊच देत नाहीत. बाहेर असलेल्या एका खोलीमध्ये बसवून मुद्रणालयातील कर्मचारी कम दलाल नवीद सय्यदला बोलावून सामान्यांची भेट घडवून आणत होते. तेथेच हा कर्मचारी अर्जंटच्या नावाखाली दीड हजार रुपयांची मागणी करायचा.

आता ही प्रक्रिया ऑनलाइन झालेली असतानाही सर्वसामान्यांच्या भोळेपणाचा फायदा घेत येथील कर्मचारी पैसे उकळत असल्याचेही चमूने वृत्तातून मांडले होते. त्याची दखल घेत मुद्रणालयाचे व्यवस्थापक एस. एम. ढवळे यांनी पैसे मागणाऱ्या नवीद सय्यद याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

सय्यदकडून आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने ढवळे यांनी सय्यदची विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. प्रस्तावासाेबत डीबी स्टारची बातमी, व्हिडिओची कॅसेटही संचालकांना पाठवली होती. मात्र, आता या घटनेला सात महिने होत आले तरीही चौकशी सुरू झालेली नाही.

लवकरच चौकशी
आम्ही विभागीय चौकशीचा प्रस्ताव संचालकांना पाठवला आहे. लवकरच संचालकांकडून चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक होईल. -एस. एम. ढवळे, व्यवस्थापक,शासकीय मुद्रणालय
बातम्या आणखी आहेत...