आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांवरील तणाव शिक्षणाचा नव्हे, पालकांचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लहान मुलांमध्ये मधुमेह, रक्तदाबाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण शिक्षण पद्धती नसून पालकांच्या मनातील स्पर्धा आहे. मूल शिक्षणामुळे दबावात येत नाही तर पालकांच्या अपेक्षांचा ताण त्यांना आजारांकडे ढकलत आहे. मुलांना आई-वडिलांचा गुणवत्तापूर्ण वेळ मिळाल्यास उत्तम आरोग्य मिळेल, असे मत अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केले.

राज्यस्तरीय महापेडिक्रिटीकॉन परिषदेसाठी ते नुकतेच शहरात आले असता त्यांनी लहान मुलांच्या विविध आजारांविषयी माहिती दिली. डॉ. जोग म्हणाले, लहान मुलांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यावर येणारा तणाव याच्या मुळाशी आहे. शिक्षणाचा ताण सहन करण्याचे कौशल्य मुलांमध्ये आहे. मात्र आई-वडिलांचा दबाव त्यांना सहन होत नाही. शहरी भागात आईचा सहवास, संवाद आणि स्पर्श मुलांना लाभत नसल्याने मुलांचे आरोग्य ढासळत चालले आहे. या तुलनेत ग्रामीण भागातील मुलांचे स्वास्थ्य चांगले आहे.

कँटीन संस्कृती मारक
दुर्गमतसेच ग्रामीण भागात सकस अन्न मिळाल्याने मुलांचे पोषण होत नाही, तर शहरात अन्नाचे अतिप्रमाणात सेवन हे देखील कुपोषणच आहे. शहरी भागात पिझ्झा, बर्गर, चायनीजला पसंती दिली जाते. मुलांना यातून पोषणतत्त्व मिळत नाही. आई नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तिचा वेळ बाळाला मिळत नाही. डे केअर सेंटरमध्ये मुलांना घराऐवढे आश्वासक वातावरण मिळत नाही. हल्ली शाळांत जेवण दिले जाते. यामुळे माता सुटकेचा श्वास सोडतात, पण त्या आहारातून मुलांना खरेच पोषण मिळते का हे पाहणे गरजेचे आहे. वाढत जाणारी कँटीन संस्कृती आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

स्टेम सेल्सची परिणामकारकता सिद्ध झालेली नाही
मुलांसाठी पालक काहीही करायला तयार होतात. त्यामुळे हल्ली स्टेम सेल्स प्रिझर्व्हेशनची लाट आली आहे. मात्र, यात कितपत तथ्य आहे हे अजून सिद्ध झालेले नाही. भारतात स्टेम सेल्स तितक्या परिणामकारक नाहीत.

प्रतिजैविकांचा शरीरावर वाईट परिणाम
९०टक्के आजारांमध्ये प्रतिजैविकांची गरज नसते. याची डॉक्टरांना पूर्ण जाणीव असते. मात्र, पालकांच्या आग्रहास्तव ती द्यावी लागतात. प्रतिजैविकांचा शरीरावर वाईट परिणाम होतो. याखेरीज प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे घेण्याची वाईट पद्धती बळावली आहे. याचेही गंभीर परिणाम होऊ शकतात. ग्रामीण भागातील डॉक्टरांना बालकांच्या आजारांविषयी अधिक संवेदनशील करून उपचारांची योग्य दिशा देणे, सुविधांविषयी जागरूक करणे आवश्यक आहे.