आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी सैनिकांची दमछाक! सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांची अन्न, निवाऱ्यावाचून दैना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - छातीची ढाल करून देशाचे रक्षण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य भरतीसाठी दाखल झालेल्या तरुणांना सैनिकी प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराचा फटका बसत आहे. गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलावर ही सैन्य भरती सुरू आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. भरती प्रक्रिया रात्रीच केली जात असल्याने या तरुणांना उघड्यावरच आराम करण्याची वेळ आली आहे. सैनिक कल्याण विभागानेही या तरुणांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तरुणांना रात्र विना निवारा उघड्यावरच काढावी लागत आहे.

मराठवाडा व खान्देशातील नऊ जिल्ह्यांसाठी सैन्याच्या भरती विभागामार्फत विभागीय क्रीडा संकुलावर मंगळवार (२१ जुलै) पासून विविध पदांसाठी खुली भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रात्री भरती प्रक्रिया राबवल्याने युवकांचा आराम होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सैन्यातील मराठी टक्का घटणार असून, मराठवाडा व खांन्देशच्या युवकांना याचा फटका बसत आहे. २१ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी हिंगोली व नंदूरबार (२१ जुलै), जळगाव जिल्हा (२२, २३ व २४ जुलै), परभणी जिल्हा (२५ जुलै), नांदेड जिल्हा (२६ व २७ जुलै), बुलडाणा जिल्हा (२८, २९, व ३१ जुलै), जालना जिल्हा (१ ऑगस्ट) , आैरंगाबाद जिल्हा (२, ३, व ४ ऑगस्ट), धुळे जिल्हा (५ ऑगस्ट), विविध आरक्षणातील पात्र उमेदवारांसाठी ६ ऑगस्टला भरती केली जाईल.

पहाटे शारीरिक चाचणी
या भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची व्यवस्था नसून, रात्री २ वाजता त्यांना आत घेतले जात असून पहाटे ४ वाजता शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. सायंकाळी ७ वाजेपासून आलेल्या तरुणांना रात्री विश्रांती न घेताच शारीरिक चाचणीला सामोरे जावे लागत आहे. भरतीसाठी गरीब व सर्वसामान्यांचीच मुले येतात. त्यांची खाण्यापिण्याचीही व्यवस्था केलेली नाही. त्यांना प्रशासनातर्फे बिस्किटे अथवा केळीही दिली जात नाही. यापूर्वी सकाळी सहा वाजता भरती प्रक्रिया केली जात होती.

सैनिक कल्याणचेही दुर्लक्ष
जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे जिल्हा सैनिक अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांच्याकडे नगर येथील पदभार असून, आैरंगाबादसह पुणे येथील सहायक संचालक विभागाचाही अतिरिक्त भार त्यांच्यावर आहे. त्यांचे आैरंगाबादला येणेच होत नाही. एवढी मोठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने त्यांनी आैरंगाबादला भेट देणे गरजेचे होते. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधीच्या खर्चाला त्यांच्याशिवाय कुणीच मंजुरी देऊ शकत नाही. त्यामुळे इच्छा असूनही सैनिक विभाग तरुणांना सुविधा उपलब्ध करू देऊ शकत नाही.

रात्र उघड्यावर
भरतीसाठी आलेले तरुण सोमवारी रात्री क्रीडा संकुलाबाहेर रस्त्यावरच झोपले होते. मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक तरुण काही वेळ आराम करण्यासाठी निवारा शोधत होते. क्रीडा संकुलाच्या आसपासची दुकाने, शॉपिंग कॉम्लेक्स आणि काही निवासस्थानांच्या वऱ्हांड्यात तरुण पहुडले होते. या परिसरात लॉजिंगची व्यवस्था नसल्याने तरुणांना कुठेतरी आसरा शोधण्याशिवाय पर्यायच उरला नाही.
बातम्या आणखी आहेत...