आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात किती बियाणे दिले; माहिती गुलदस्त्यातच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पेरणीच्या दिवसांत बी-बियाण्यांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याला बी-बियाणे आणि खतांचा किती कोटा दिला आहे, हे सर्व शेतक-यांना समजावे यासाठीच्या जाहिराती वृत्तपत्रांतून दिल्या जातील, अशी घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी केली होती. प्रत्यक्षात दोन दिवसांच्या पावसानंतर पेरणीची तयारी झाली तरीही अशा जाहिराती देण्यात आलेल्या नाहीत.


पावसाचे आगमन झाल्यानंतर बियाणे तसेच खत खरेदीसाठी शेतक-यांची झुंबड उडाली असतानाही प्रशासनाच्या वतीने तशा जाहिराती प्रसिद्धीस देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे काळाबाजार करणा-यांचे चांगलेच फावत आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे विचारणा केली असता येत्या दोन दिवसांत जाहिराती झळकतील, असे त्यांनी सांगितले.


पाऊस झाला नसल्याने आतापर्यंत जाहिराती देण्यात आल्या नव्हत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दुसरीकडे सोमवारपासून शेतक-यांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली असून विक्रेत्यांकडून याचा फायदा घेतला जात आहे. छापील किमतीच्या दुप्पट दराने बियाण्यांची विक्री होत असल्याची तक्रार शेतक-यांनी केली आहे.


काळाबाजार होतोय मला कळवा
दरम्यान, एखाद्या दुकानात काळाबाजार होत असेल तर शेतकरी थेट जिल्हाधिका-यांकडे वर्दी देऊ शकतात. कोणी जास्त दराने बियाण्यांची विक्री करत असेल तर माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, दुकानदाराचे नाव कळवल्यास लगेच कारवाई केली जाईल, असे विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे. बियाणे तसेच खतांचा साठा पुरेसा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


अशा झळकतील जाहिराती
सिल्लोड तालुक्यासाठी 10 हजार मेट्रिक टन खत नि 1 हजार मेट्रिक टन बियाणे असेल तर तशी जाहिरात सर्वत्र केली जाईल. गरजेइतका साठा शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे टंचाई असल्याचे भासवून विक्रेते बियाण्यांची चढ्या दराने विक्री करणार नाहीत. काळाबाजार रोखण्यासाठीच या जाहिराती देण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी शेतक-यांनी खरेदी सुरू केली तरी अजून जाहिराती झळकल्या नसल्याने शासनाचा नेमका उद्देश काय असावा, असा प्रश्न समोर येत आहे.