आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Long Planning Bring Vaitarana Water Into Jayakwadi

वैतरणाचे पाणी जायकवाडीत आणण्यासाठी दीर्घ नियोजन नको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वैतरणाचे पाणी जायकवाडीत आणण्यासाठी महसूल खात्याच्या वतीने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. हे पाणी जायकवाडीत सहज आणता येणे शक्य आहे. त्यामुळे यासाठी दीर्घ नियोजन करण्याची गरज नसून दोन वर्षांच्या आत हे पाणी आणता येऊ शकते. याविषयी आपण जलसंपदामंत्र्यांशी बोललो असून मुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

वैतरणाचे पाणी जायकवाडीत यावे यासाठी मराठवाडा विकास मंडळाच्या वतीने २२ मार्च रोजी राज्यपालांसमोर सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र सरकारच्या जलसंसाधन, गंगा स्वच्छता अभियान मंत्री उमा भारती यांच्याकडेही प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवड्यातच सांगितले होते. याविषयी मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे यांनी सांगितले की, हे पाणी सहज आणणे शक्य आहे. मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जायकवाडीत पाणी आणणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घातले तर हा प्रश्न तातडीने निकाली निघू शकतो, असे नागरे म्हणाले. बागडे म्हणाले, वैतरणामधून वाहून जाणारे पाणी गेटच्या माध्यमातून अगदी कमी खर्चात गोदावरी खोऱ्यात आणता येते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत या विषयावर चर्चादेखील झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. १९९९ मध्ये माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या दुसऱ्या सिंचन आयोगाने ऊर्ध्व गोदावरीचे खोरे तुटीचे असल्याने या खोऱ्यात वैतरणाचे पाणी वळवण्याची शिफारस केली होती. वैतरणाचे पाणी दोन वर्षांच्या आत सहज आणणे शक्य असल्याचे सेंट्रल वॉटर कमिशनचे अध्यक्ष राहिलेल्या माधवराव चितळे यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

जलसंपदा मंत्र्यांकडे विषय मांडणार
अधिवेशनात वैतरणाचे पाणी जायकवाडीत आणण्याचा विषय मांडण्यात आला होता. लवकरच जलसंपदा मंत्रालयात बैठक होणार आहे. जायकवाडीत पाणी आणण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येईल. दुष्काळी पार्श्वभूमीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. -प्रशांत बंब, आमदार,गंगापूर

मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार
जायकवाडीची समस्या कायमस्वरूपी सोडवणे गरजेचे आहे. दुष्काळामुळे सर्व क्षेत्रांना नुकसान सहन करावे लागत आहे. हे पाणी आणण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. - अतुल सावे, आमदार