औरंगाबाद - जालना रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या दोन एकर सरकारी जागेवर राज्य शासनातर्फे उभारण्यात येणा-या लोकनेेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकास एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन) विरोध दर्शवला आहे. मुंडेंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या नावे २०० खाटांचे अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय उभारावे. त्याच्या आवारात मुंडे यांचा पुतळा असावा, असा एमआयएमचा आग्रह आहे.
मुंडेंच्या स्मारकासाठी सरकार पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी महिनाभरापूर्वीच त्यासाठी जागा निश्चित केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. पुढे मंत्रिमंडळाने स्मारक उभारणीस मंजुरी दिली. या संदर्भात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, मुंडे मराठवाड्याचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेते होते. त्यांच्याविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. त्याबद्दल कुणीही शंका घेऊ नये. मात्र, त्यांचे केवळ स्मारक उभारून काय साध्य होणार, असा प्रश्न आहे. मुंडेंचे आयुष्य गरिबांचे कल्याण व वंचितांना न्याय मिळवून देण्यात गेले. त्यामुळे त्यांचे स्मारक उभारण्याऐवजी एखादे अद्ययावत रुग्णालय झाले तर ते अधिक लोकांच्या उपयोगी ठरेल. गोरगरीब जनता मुंडेंना, सरकारला आणि भाजपच्या नेत्यांनाही दुवा देईल. रुग्णालयाच्या आवारात मुंडेंचा पुतळा उभा राहू शकतो.
कडाडून विरोध करणार
औरंगाबादेत २०० खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी ४५ कोटी निधी आहे. दीड वर्षांपासून त्यासाठी ७ एकर जागा मिळालेली नाही. लोकोपयोगी कामाऐवजी स्मारकासाठीच डेअरीची जागा वापरल्यास एमआयएम त्यास कडाडून विरोध करील, असा इशारा जलील यांनी दिला. अरबी समुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी १९०० कोटींची तरतूद म्हणजे जनतेच्या पैशाचा दुरुपयोग असल्याचे जलील म्हणाले.