आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा तिजोरीत खडखडाट, १३० कर्मचाऱ्यांचा ३ महिन्यांचा पगार थकला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आधीच रिकामी तिजोरी त्यात पीएफने दोन खाती सील केली, अशा आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेची कोंडी वाढत चालली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या १३० कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज मनपात धाव घेतली तर निवडणुकीच्या काळात मतपत्रिका व इतर साहित्याची छपाई करणाऱ्या शासकीय मुद्रणालयाच्या कर्मचाऱ्यांनी थकीत ९ लाख रुपयांसाठी मनपात हेलपाटे घातले. मात्र कोणालाही आपली मागणी पूर्ण करून घेण्यात यश आलेले नाही.

पुन्हा पीएफ कार्यालयाने मनपाची आयडीबीआय व एचडीएफसी या दोन बँकांतील महत्त्वाची खाती सील करून चांगलीच कोंडी केली. या खात्यामार्फतच मनपाचे मोठे व्यवहार होत असल्याने या महिन्यात पगाराचे वांधे होण्याची शक्यता असल्याचे आजच ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी ही खाती पुन्हा सुरू करण्यात आली नव्हती. राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनच्या १३० कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज आरोग्य विभागात धाव घेतली. तेथे डाॅ. संध्या टाकळीकर यांची भेट घेऊन त्यांना सारा प्रकार सांगितला. त्यांनी आपण याबाबत निश्चित बोलू, असे आश्वासन दिले. तिकडे शासकीय मुद्रणालयाच्या कर्मचाऱ्यांनी थकलेल्या ९ लाख रुपयांसाठी आज मनपात या विभागातून त्या विभागात चकरा मारल्या.

मनपा निवडणुकीच्या काळात प्रदत्त मतदान, पाेस्टल मतदान, मतदान यंत्रांवर लावण्यासाठी व मतदान केंद्रांवर लावण्यासाठी मतपत्रिका व इतर साहित्याची छपाई शासकीय मुद्रणालयात करण्यात आली होती. या कामाचे बिल ९ लाख रुपये झाले असून शासकीय मुद्रणालयाने त्याबाबत मनपाकडे बिल चुकवण्याची मागणी केली. मुद्रणालयाचे अधिकारी तीन वेळा उपायुक्त किशोर बोर्डे यांना भेटून गेले. त्यांनी मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे बोट दाखवले. त्यानंतरही टोलवाटोलवी सुरूच आहे. आज शासकीय मुद्रणालयाचे कर्मचारी सकाळी १० वाजेपासून मनपात याच कामासाठी आले होते, पण सायंकाळपर्यंत त्यांना
इकडून तिकडेच फिरवण्यात आले. शेवटी तेही परत गेले.