आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत खड्डा पडायलाही रस्ता उरला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एक तरुण म्हणाला, ‘मी शाळेत असताना याच खड्डय़ांतून जायचो, आता बीएस्सी करतोय, कॉलेजला जातानाही याच खड्डय़ांतून जातो.’ एक पोलिस कर्मचारी गमतीने म्हणाला, ‘अशा खड्डय़ांतून कुणाचा पाठलाग करणे सोडा, आपला तोल जरी सांभाळता आला तरी खूप आहे.’ तीन वर्षांपासून झगडणार्‍या एक नगरसेविका हताश होऊन म्हणाल्या, ‘प्रशासन इतके निगरगट्ट आहे की काहीच कामे होत नाही. आम्हीच आता जनतेची माफी मागतो.’

हे उद्गार आहेत जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाक्यावरून रोज खड्डय़ांचे दणके सहन करत येणार्‍या जाणार्‍यांचे. दीड किलोमीटरच्या या रस्त्यावर आता खड्डा पडायला रस्ता उरला नाही. हजारो नागरिकांना मुंगीच्या चालीने प्रत्येक खड्डा चुकवत मार्ग काढताना देवाचा धावाच करावा लागतो.

एक तपापूर्वी मनपाने जळगाव रोड ते मध्यवर्ती जकात नाका हा दीड किलोमीटरचा रस्ता तयार केला होता. जेएनइसी, एमजीएम, भगवान होमिओपॅथी ही महाविद्यालये, एसबीआय, सिडको ही कार्यालये आणि सिडकोच्या वसाहती यामुळे रोज हजारो वाहनांची वर्दळ असणारा हा रस्ता आहे. चार वर्षांपूर्वी डांबराचा एक थर सोडला तर या रस्त्याचे नशीब कधी उजळलेच नाही. उलट वाहतूक वाढली, दुर्लक्ष वाढले आणि रस्त्याची चाळणी झाली. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत खोल खड्डे तयार झाले, दिवसागणिक वाढत गेले. आता तर अशी परिस्थिती आहे की खड्डे पडण्यासाठी रस्ताच उरलेला नाही.

साडेतीन कोटी मंजूर, पण.. : या रस्त्याचे नशीब उजळण्याची अंधुक आशा निर्माण झाली आहे. अंधुक यासाठी की बजेटमध्ये साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले पण काम कधी सुरू होईल याची खात्री कुणालाच नाही. मनपाच्या तिजोरीत ठणठणाट आहे. या भागातील नगरसेवक वीरभद्र गादगे, रेखा जैस्वाल, हुशारसिंग चौहान या तीनही नगरसेवकांनी मनपात भांडत या रस्त्याचे बजेट मंजूर करून घेतले पण त्यांनाही काम कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. गादगे यांनी सांगितले की, आता गरज आहे ती तातडीने खड्डे बुजवण्याची. ते काम हाती घेतले आहे. चार पाच दिवसांपूर्वी मुरुम आणि दगड टाकून बरेच खड्डे बुजवण्यात आले.


संतप्त प्रतिक्रिया
पाठदुखी सुरू झाली
मी नववी दहावीला असताना याच खड्डय़ांतून सेंट लॉरेन्स शाळेत रोज जायचो. आता बी. एस्सी. करतोय. रस्ता तोच आहे आणि खड्डे पण तेच आहेत. या खड्डय़ांमुळे पाठीचे दुखणे सुरू आहे. आणखी किती काळ असेच चालणार ते समजत नाही. साधा रस्ता आपण चांगला देऊ शकत नाही याची लोकप्रतिनिधींना खंतही वाटत नाही.
सय्यद जाहेद कादरी, विद्यार्थी


यापेक्षा खेडे बरे!
औरंगाबाद शहराचे रस्ते अतिशय वाईट आहेत. औरंगाबादला आमच्याकडे या असे पाहुण्यांना सांगायचीदेखील लाज वाटते. यापेक्षा खेड्यात राहिलेले बरे असे वाटण्याजोगी ही स्थिती आहे. केवळ हाच रस्ता नव्हे तर शहरात सगळीकडे हीच अवस्था आहे. नागरी सुविधांची एवढी आबाळ इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही.
अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त


पावसात वाहून गेले
या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी नुकतेच मुरुम, माती, दगड टाकले पण पावसात ते वाहून गेले. खड्डय़ांमुळे रोज अपघात घडतच असतात. गेल्या तीन चार वर्षांपासून तर परिस्थिती अतिशय वाईट बनली आहे. या मार्गावर उतार असल्याने पावसाचे पाणी तुंबते आणि खड्डे वाढत आहेत.
प्रमोद क्षीरसागर, हॉटेल व्यावसायिक


नागरिकांना थोडा त्रास होईल
हा रस्ता व्हावा यासाठी आम्ही तिघे नगरसेवक सतत भांडत आहोत. आतापर्यंत किमान 8 निवेदने दिली. सभागृहात भांडलो. आता अखेर बजेट मिळाले आहे. रस्ता लवकर तयार होईल अशी आशा आहे. तोपर्यंत नागरिकांना थोडा त्रास होणार आहे. मात्र तातडीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
वीरभद्र गादगे, नगरसेवक


हात टेकण्याची वेळ आली
या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे. नागरिक आम्हाला दोष देतात. पॅचवर्कचे कामदेखील निव्वळ दगड, मुरूम टाकून केले गेले. ते पण इतके वाईट की यापेक्षा खड्डे बरे म्हणण्याची वेळ आहे. मनपाच्या या ढिम्म कारभारापुढे हात टेकण्याची वेळ आली आहे. आता आम्ही जनतेची माफी मागतो.
रेखा जैस्वाल, नगरसेविका.